Diamond Duck म्हणजे काय? ज्यामुळे ऋतुराज आणि अर्शदीप ठरले अनलकी!
Diamond Duck In T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांची विकेट चर्चेचा विषय राहिल.
IND vs AUS 1st T20I : सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतलाय. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाची भारताविरोधात टी-20 क्रिकेटमधलीही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. मात्र, अखेरच्या चेंडूवर रिंकू सिंगने खणखणीत सिक्स मारत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाने दिलेलं 209 धावांचं आव्हान पार केलं. मात्र, या सामन्यात दोन अजब प्रकार पहायला मिळाले.
टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या एका चुकीमुळे ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) विकेट गमवावी लागली. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांची विकेट चर्चेचा विषय राहिली. ऋतुराज गायकवाड एकही चेंडू खेळू शकला नाही, तो शून्यावर बाद झाला. त्यांच्या विकेटनंतर डायमंड डक हा शब्द सर्वांच्या कानी पाडला होता. मात्र, डायमंड डक म्हणजे काय? असा सवाल तुम्हालाही पडला असेल.
डायमंड डक (Diamond Duck) म्हणजे काय?
जेव्हा एखादा खेळाडू कोणत्याही चेंडूचा सामना न करता नॉन-स्ट्राईकवर उभा असतो आणि धावा घेताना तो शून्यावर धावबाद होतो तेव्हा त्याला डायमंड डक (Diamond Duck) म्हणतात. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे बाद होणारा ऋतुराज गायकवाड हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हा डायमंड डक होणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
याआधी टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डायमंड डक म्हणून बाद होणारा पहिला भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराह होता. तर दुसरा रेकॉर्ड हा अमित मिश्राच्या नावावर आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना अमित मिश्रा डायमंड डक झाला होता. त्यानंतर आता ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंग यांचं नाव जोडलं गेलं आहे.
दरम्यान, ईशान किशनच्या साथीने जयस्वालने आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 21 धावा केल्या. यात त्याने 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. सूर्यकुमार यादवने कॅप्टन इनिंग खेळत 42 चेंडूत 80 धावा केल्या. यात त्याने 4 षटकार आणि 9 चौकारांची बरसात केली. तर रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडियाने 1-0 ने आघाडी मिळवली आहे.