दुबई : आयपीएलच्या १३व्या मोसमाला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथने चेन्नईच्या टीमबद्दलचं एक गुपित उजेडात आणलं आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमासाठी धोनी हा चेन्नईच्या टी मॅनेजमेंटची पहिली पसंत नव्हता. तर वीरेंद्र सेहवाग चेन्नईच्या मॅनेजमेंटला टीममध्ये कर्णधार म्हणून हवा होता, असं बद्रीनाथ म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००८ साली धोनीऐवजी चेन्नई सुपरकिंग्ज सेहवागला टीममध्ये सामील करून घेण्यासाठी इच्छूक होती. त्यावेळी ओपनर बॅट्समन असलेल्या सेहवागला चेन्नई कर्णधार बनवणार होती. पण टीमचे मालक एन श्रीनिवासन यांना सेहवाग दिल्लीसाठी खेळण्यास इच्छूक आहे, हे कळलं तेव्हा त्यांनी धोनीच्या नावाचा विचार केला आणि त्याच्यावर १५ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच ६ कोटी रुपयांची बोली लावली.


आयपीएल सुरु व्हायच्या एक वर्ष आधीच भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. तसंच धोनीची ओळखही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिनिशरच्या रुपात झाली होती. त्यामुळे धोनीला चेन्नई सुपरकिंग्जने विकत घेतलं. 


एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या टीमने ३ वेळा आयपीएल आणि २ वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. आयपीएल इतिहासात चेन्नईची एकमेव टीम सगळ्या मोसमाच्या प्ले ऑफमध्ये खेळली आहे. आतापर्यंतच्या सगळ्या मोसमात धोनी चेन्नईचा कर्णधार होता. याचवर्षी १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण आयपीएलमध्ये मात्र तो खेळणार आहे.