मुंबई : भारतामध्ये आज राष्ट्रीय खेळ दिवस (२९ ऑगस्ट) साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त 'फिट इंडिया मुव्हमेंट'ला सुरुवात केली आहे. याला सचिन तेंडुलकरनेही प्रतिसाद दिला आहे. सचिन तेंडुलकर वांद्र्याच्या एका वृद्धाश्रमात गेला. वृद्धाश्रमातल्या महिलांसोबत सचिन कॅरम खेळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 'आज सेंट एंथनी ओल्ड एज होममध्ये जाऊन या महिलांसोबत वेळ घालवला. त्यांनी दाखवलेल्या प्रेमामुळे चांगलं वाटलं. त्यांची कॅरम खेळण्याची उत्सुकता वाखणण्याजोगी आहे. खेळ आणि फिटनेस प्रत्येकासाठी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ते योग्यच आहे,' असं ट्विट सचिनने केलं. 



सचिन तेंडुलकरने यानंतर लगेच दुसरं ट्विट केलं. या ट्विटमध्ये सचिन विनोद कांबळीसह टेनिस आणि बॅडमिंटन खेळत आहे. 'मित्राबरोबर खेळताना भरपूर मजा येते. एकमेकांना आव्हान देता येतं आणि तुम्ही फिटही राहता,' असं ट्विट सचिनने केलं. तसंच तुम्ही कोणता खेळ खेळता? असा प्रश्नही सचिनने विचारला. 



२९ ऑगस्ट हा भारताचे महान हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिन म्हणूनच राष्ट्रीय खेळ दिवस साजरा केला जातो. आजच्याच दिवशी भारत सरकार खेळाडूंना खेल रत्न आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित करते.