मुंबई : नाताळचा सण भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंही ख्रिसमस साजरा केला. पण हा सण साजरा करताना त्यानं सामाजिक भान जपलं. सचिन तेंडुलकर सांताक्लॉज बनून मुंबईतल्या गरिब मुलांच्या घरी गेला. या मुलांना सचिन तेंडुलकरनं गिफ्ट दिलं. सांताक्लॉजनं दिलेली ही गिफ्ट पाहून या मुलांच्या चेहऱ्यावरही हसू आलं. सचिन तेंडुलकरनं या मुलांबरोबर डान्स केला आणि गाणीही म्हणली.



सचिन तेंडुलकरनं या मुलांसोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. ख्रिसमसच्या सगळ्यांना शुभेच्छा. आश्रय चाईल्ड केअर सेंटरच्या या चिमुरड्यांबरोबर वेळ घालवण्यात मजा आली. या निष्पाप मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमुल्य होता, अशी पोस्ट सचिन तेंडुलकरनं केली आहे.