मुंबई : २३ मे १९९९ हा दिवस सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील खास दिवस आहे. याच दिवशी सचिनने आपल्या वनडे करिअरमधील २२वे शतक ठोकले होते. हे सचिनच्या आयुष्यातील लक्षात राहण्याजोगे शतक आहे. या शतकानंतर सचिनच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. सचिनने हे शतक आपल्या वडिलांना समर्पित केले होते. सचिनच्या या खेळीने संपूर्ण देशाने त्याला सलाम ठोकला होता. स्टेडियममध्ये लोक पोस्टर आणि बॅनर घेऊन आले होते यात सचिन हम तुम्हारे साथ हैं सचिन... भारत तुम्हारे साथ है सचिन... असं म्हटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी सचिनने केनियाविरुद्ध नाबाद १४० धावांची खेळी केली होती. यात त्याने १०१ चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि तीन षटकारांसह १४० धावा तडकावल्या होत्या. या सामन्यात भारताने ९४ धावांनी विजय मिळवला होता. सचिन तेंडुलकरची ही खेळी यासाठी खास आहे कारण वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्याने हे शतक ठोकले होते.


खरंतर, १९९९मध्ये वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळवला जात होताय भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता. टीम इंडियाचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होता. त्यांच्याविरुद्धचा पराभव म्हणजे भारत आणखी मागे गेला असता. देशाच्या सगळ्या आशा सचिनलर टिकून होत्या. मात्र या सामन्याआधी सचिनच्या वडिलांचे निधन झाले. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरने स्वत: इंग्लंडला येऊन ही बातमी दिली होती. ही बातमी ऐकताच सचिन मुंबईसाठी रवाना झाला. वडिलांच्या मृत्यूमुळे सचिनवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सचिन खेळू शकला नव्हता. या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. 


 

>

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर भारतावरुन वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचे संकट घोंघावत होते. एकीकडे सचिन दु:खात होता. भारताचा पुढचा सामना केनियाविरुद्ध होता. जर भारताने हा सामना गमावला असता तर भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला असता. सचिन तेंडुलकर यावेळी भारतात होता. मात्र वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर त्याने एक निर्णय घेतला. या निर्णयाने त्याला महान केले. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर तो इंग्लंडला रवाना झाला. त्याने केनियाविरुद्धचा सामना खेळला आणि या सामन्यात नाबाद १४० धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या शतकानंतर त्याने आभाळाच्या दिशेने पाहिले आणि बॅट उंचावत आपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या केल्या. सचिनच्या डोळ्यात यावेळी अश्रू तरळले होते. ज्यावेळी सचिनने शतक पूर्ण केले तेव्हा केवळ सचिनच्याच डोळ्यात अश्रू नव्हते तर प्रेक्षकांनाही अश्रू आवरले नाहीत.