मुंबई : टीम इंडियाचा (Team India) युवा सलामीवीर शुबमन गिल (Shubaman Gill) गेल्या काही वर्षांपासून शानदार कामगिरी करतोय. अंडर 19 वर्ल्ड कप 2018 विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गिलने आयपीएलमध्ये (IPL) धमाकेदार कामगिरी केली. यानंतर त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. या सातत्यतपूर्ण खेळीच्या जोरावर त्याने टीम इंडियाच्या कसोटी संघातील स्थान मिळवलं. (Sachin Tendulkar has said that Shubman Gill has the technique and attitude to bat any order in the Indian Test team)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुबमन मुंबईत होत असलेल्या दुसऱ्या कसोटीतही खेळतोय. या सामन्यात त्याला रोहित शर्मा आणि केएल राहुल हे नियमित सलामीवीर जोडी नसल्याने संधी मिळाली आहे. शुबमनने या सामन्यातील पहिल्या डावात 44 धावांची खेळी केली. टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) गिलबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.     


गिलकडे कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही स्थानावर बॅटिंग करण्याची क्षमता आणि तंत्र ज्ञात आहे. मात्र त्याला चांगल्या खेळीच रुपांतर हे मोठ्या खेळीत करायला हवं, असं सचिन म्हणाला.   


सचिन काय म्हणाला? 


"खेळण्याच्या तंत्राबाबत म्हणायचं झाल्यास प्रत्येक खेळपट्टीवर विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.  शुबमनने ब्रिस्बेनमध्ये केलेल्या 91 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने कसोटी सामना जिंकला होता", असं उत्तर सचिनने दिलं. गिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत मीडल ऑर्डरमध्ये खेळण्याची क्षमता आहे का, असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला होता. तो पीटीआयसह बोलत होता.


"शुबमनकडे अवघड आणि बाऊन्स पीचवर खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या खेळण्याच्या तंत्राबाबत काहीच आक्षेप नाही. त्याने अनेकदा चांगली सुरुवात केली आहे. पण आता या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्याची वेळ आली आहे", असंही सचिन म्हणाला. 


"गिलने शतक पूर्ण करण्यासाठी दबाव घेऊ नये. कारण त्याच्यात धावांची भूक आहे. चांगल्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यासाठी गिलने एकाग्र राहायला हवं, त्याने ती एकाग्रता गमावता कामा नये. गिल कानपूर आणि मुंबई कसोटीत चांगल्या चेंडूवर बाद झाला. गिल सध्या शिकतोय", असंही सचिनने नमूद केलं.