अर्जुनच्या निवडीबाबत सचिन तेंडुलकरचे मोठे विधान
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारताच्या अंडर १९ संघात निवड झालीये.
मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारताच्या अंडर १९ संघात निवड झालीये. १८ वर्षीय डावखुरा गोलंदाज अर्जुन गेल्या वर्षी कूच बिहार ट्रॉफीमध्ये मुंबईच्या अंडर १९ संघाकडून खेळला होता यात त्याने १८ विकेट मिळवल्या होत्या. ज्युनियर निवड समितीने येथे झालेल्या बैठकीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी अर्जुनची संघात निवड केलीये. दरम्यान पाच वनडे सामन्यांसाठी त्याला संघात निवडण्यात आलेले नाही. भारतीय संघ श्रीलंकेत ११ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान दोन सीरिज खेळणार आहे.
अर्जुनच्या निवडीवर सचिन म्हणाला, अर्जुनची संघातील निवड ही त्याच्या करिअरमधील माईलस्टोन ठरणार आहे. अंजली आणि मी नेहमीच अर्जुनच्या निवडीसाठी पाठिंबा देऊ आणि त्याच्या यशासाठी प्रार्थना करु.
अर्जुनला अनेकदा टीम इंडिया आणि दुसऱ्या संघांसोबत नेट प्रॅक्टिस करताना पाहिले गेलेय. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही त्याची गोलंदाजी पाहिलीये. गेल्या वर्षी अर्जुनने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एक दिवसीय सामन्यांच्या सिरीजआधी वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियासोबत सहभाग घेतला होता. जेव्हा लॉर्ड्सवर अर्जुन इंग्लंडच्या टीमसोबत नेट प्रॅक्टिस करत होता तेव्हाही त्याच्या नावाची चर्चा होती.
गोलंदाजी प्रशिक्षकांनीही केले अर्जुनचे कौतुक
सचिनच्या विधानाव्यतिरिक्त मुंबईच्या अंडर १९ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक सतीश सामंत यांनीही अर्जुनचे कौतुक केलेय. एका मीडिया रिपोर्टनुसार सामंतच्या मते अर्जुनने या सीझनमध्ये चांगली गोलंदाजी केलीये. अर्जुनमध्ये बरंच काही करण्याची क्षमता आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत अर्जुनच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा झालीये. गोलंदाजीची लय सुधारलीये. त्याच्याकडे चांगला यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे.