मुंबई : टी-२० क्रिकेटच्या जमान्यात वनडे क्रिकेट बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी कमी झालेली पाहायला मिळत आहे. मैदानाबरोबरच टीव्हीवरही फॅन्सचा वनडे मॅच पाहण्याचा रस कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटचा रोमांच वाढावा, यासाठी सचिनने नवा फॉर्म्युला दिला आहे. प्रत्येक टीमला २५-२५ ओव्हरच्या दोन इनिंग देण्यात याव्यात. यामुळे प्रेक्षकांचा वनडे क्रिकेट पाहण्यात रस वाढेल आणि मॅच दाखवणाऱ्या चॅनललाही याचा फायदा होईल, असं मत सचिनने मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी २००९ सालीही सचिनने अशाच प्रकारचा प्रस्ताव मांडला होता, पण आयसीसीने या प्रस्तावाला मंजुरी दिली नव्हती. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन म्हणाला, 'वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिले लक्ष घालण्याची गरज आहे. वनडे क्रिकेट ४ इनिंगमध्ये खेळवलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक इनिंगनंतर १५ मिनिटांचा ब्रेक देण्यात यावा.'


काय आहे सचिनचा फॉर्म्युला?


टीम एने टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतली तर पहिले २५ ओव्हर टीम ए बॅटिंग करेल. यानंतर टीम बी पुढच्या २५ ओव्हरसाठी बॅटिंगला येईल. पहिल्या २५ ओव्हरमध्ये टीम ए चा स्कोअर १५०/३ असा झाला आणि टीम बीला पुढच्या २५ ओव्हरमध्ये १४०/४ एवढा स्कोअर करता आला, तर टीम ए ला १० रनची आघाडी मिळेल. यानंतर पुन्हा एकदा टीम ए २५ ओव्हरसाठी बॅटिंगला येईल. दुसऱ्यांदा बॅटिंग करताना पहिल्या इनिंगमध्ये ३ विकेट गेल्यामुळे टीम एला उरलेल्या ७ बॅट्समनना घेऊन खेळावे लागेल. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम ए ने १६० रन केले तर पहिल्या इनिंगमधली १० रनची आघाडी आणि दुसऱ्या इनिंगमधले १६० रन असे मिळून टीम बी ला १७१ रनचं आव्हान मिळेल. हे आव्हान टीम बी ला ६ विकेटनेच पूर्ण करावं लागेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी आधीच ४ विकेट गमावल्या आहेत.


'या फॉर्म्युलामुळे टॉस महत्त्वाची भूमिका निभावणार नाही. अनेकवेळा दवामुळे टीम टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतात. दव असल्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलरना बॉल पकडणंही अवघड होऊन बसतं आणि पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा अगदी सहज विजय होतो आणि दोन्ही टीमना विजयाची समान संधी मिळत नाही', असं मत सचिनने मांडलं.


२५ ओव्हरच्या इनिंगमध्ये ५ ओव्हरचा पॉवर प्ले ठेवण्यात यावा, यातल्या ३ ओव्हरचा पॉवर प्ले बॉलिंग टीमने आणि २ ओव्हरचा पॉवर प्ले बॅटिंग टीमने घ्यावा, तसंच बॉलिंग टीमला पॉवर प्ले कधी घ्यायचा याची मुभा देण्यात यावी, असा सल्लाही सचिनने दिला आहे.