मुंबई : सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही वनडे क्रिकेटमधली सगळ्यात यशस्वी ओपनिंग जोडी आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी ओपनिंग पार्टनरशीप करण्याचा विक्रमही या जोडीच्या नावावर आहे. दोघांनी निवृत्त होऊन एवढी वर्ष झाल्यानंतरही हा विक्रम अजूनही अबादित आहे. पण निवृत्त झाल्यानंतरही हे दोन्ही खेळाडू एकमेकांची खोडी काढायचं सोडत नाहीत. यावेळी सचिन तेंडुलकरने सौरव गांगुलीने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका फोटोवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुलीने फिटनेस सेशननंतरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला. 'थंडीच्या सकाळी चांगला फिटनेस सेशन ताजातवाना करतो,' असं कॅप्शन सौरव गांगुलीने या फोटोला दिलं. सचिन तेंडुलकरनेही गांगुलीच्या या फोटोवर कमेंट केली. 'शाब्बास दादी, क्या बात है', असं सचिन म्हणाला.


सचिनच्या या कमेंटवर पुन्हा सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली. 'धन्यवाद चॅम्पियन. मला नेहमीच फिटनेस आवडतो. तुला आपले दिवस आठवत असतील,' असं गांगुली म्हणाला. गांगुलीच्या या प्रतिक्रियेवर सचिनने जोरदार टोला हाणला. 'हो आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुला फिटनेस ट्रेनिंग किती आवडायची. खासकरुन ट्रेनिंग सोडून जाणं,' अशी कमेंट सचिनने केली.



सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने १७६ वनडे मॅचमध्ये एकत्र बॅटिंग केली. या मॅचमध्ये दोघांनी ८,२७७ रनची पार्टनरशीप केली. वनडेमध्ये ही सर्वाधिक रन करणारी पार्टनरशीप आहे. सचिन आणि गांगुलीच्या नावावर सर्वाधिक रनची ओपनिंग पार्टनरशीप करण्याचाही विक्रम आहे. या दोघांनी १३६ वनडे मॅचमध्ये ओपनिंग करुन ६,६०९ रन केल्या आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक ओपनिंग शतकी पार्टनरशीपचा विक्रमही या दोघांच्या नावावर आहे. सचिन आणि सौरव यांनी वनडे क्रिकेटमध्ये २१ शतकी ओपनिंग पार्टनरशीप केल्या.