मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० मुंबई लीगमध्ये अर्जुनने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली. अर्जुनला आकाश टायगर मुंबई पश्चिम उपनगर या टीमने ५ लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. वानखेडे स्टेडियमवर अर्जुनने शनिवारी सेमीफायनल मॅच खेळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने अर्जुनला दिलेल्या गुरुमंत्राबाबत सांगितलं आहे. 'आयुष्यात काहीही कर, फक्त शॉर्टकट घेऊ नकोस,' असं मी अर्जुनला सांगितल्याचं सचिन म्हणाला. मला माझ्या वडिलांनीही शॉर्टकट घेऊ नकोस, असं सांगितलं होतं, मीदेखील माझ्या मुलाला तेच सांगितल्याची प्रतिक्रिया सचिनने दिली.


'मी अर्जुनवर कधीच कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकला नाही. मी त्याच्यावर क्रिकेट खेळण्यासाठीही दबाव टाकला नाही. अर्जुन आधी फूटबॉल खेळायचा, मग बुद्धीबळ आणि आता तो क्रिकेट खेळायला लागला आहे,' असं वक्तव्य सचिनने केलं.


'तुला मेहनत करावी लागेल, तू कुठपर्यंत जाऊ शकतोस हे तुझ्यावरच अवलंबून आहे,' असं अर्जुनला बोलल्याचं सचिन म्हणाला. दुसऱ्यांच्या आई-वडिलांप्रमाणे मलाही माझ्या मुलाने चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे, असं वक्तव्य सचिनने केलं.