ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास, मुंबई : क्रिकेटच्या देवाला तुम्ही कधीही कुणावरही रागावलेलं, कुणाला उलट उत्तर दिलेलं किंवा त्यानं कधी कुणाला सुनावलेलं पाहिलं नसेल. मात्र सचिननं आता थेट बीसीसीआयलाच खडे बोल सुनावले आहेत. हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या लोकपालांनी सचिन तेंडुलकरला नोटीस बजावली होती. त्यावर सचिनने बीसीसीआयला योग्य शब्दांमध्ये उत्तरही दिले होते. मात्र हा सारा वाद पाहता मास्टर-ब्लास्टरचा संयम संपला. यामुळेच त्याने बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी.के जैन यांना १३ मुद्दे असलेले खरमरीत पत्रच लिहिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सचिनने लिहिलेल्या पत्रामध्ये सध्या क्रिकेटमध्ये जो काही हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित केला जातोय या परिस्थितीला बीसीसीआयलाच जबाबदार धरण्यात आले आहे. या पत्रात त्याने मांडलेल्या काही मुद्द्यांनी तर थेट बीसीसीआयलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. आपण कोणत्याही पक्षपाताविना आश्चर्य व्यक्त करत आहोत. ज्या व्यक्तीला बीसीसीआयनेच प्रशासकीय समितीचे सदस्य बनवले त्याच व्यक्तीला आता बीसीसीआय हितसंबंधांच्या मुद्द्यावरून धारेवर धरत आहे. आपण २०१३मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे आयकॉन बनलो होतो. त्यानंतर २०१५ मध्ये बीसीसीआयनंच आपल्याला प्रशासकीय समितीचा सदस्य बनवले. 


प्रशासकीय समितीच्या सदस्य असलेल्या आपल्या भूमिकेबाबत आपण अनेकदा बसीसीआयकडे स्पष्टीकरण मागितलं. मात्र आजपर्यंत त्याचं काहीही उत्तर मिळालं नाही. बीसीसीआयला याची पूर्ण कल्पना आहे की प्रशासकीय समिती केवळ सल्लागाराची भूमिका बजावू शकते. अशावेळी मुंबईचा आयकॉन असणं यामध्ये कोणताही हितसंबंधांचा मुद्दा आड येत नाही.



अशा कडक आणि स्पष्ट शब्दांमध्ये सचिनने आता बीसीसीआयचीच एकप्रकारे कान उघाडणी केली आहे. आपला मुलगा अर्जुन खेळत असल्याने १९ वर्षांखालील निवड समितीपासून आपण स्वत: दूर ठेवल्याचेही सचिनने या पत्रात स्पष्ट केल आहे. आता बीसीसीआय सचिनच्या या रौद्र अवतारावर काय भूमिका घेते ? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. याखेरीज जवळपास २४ वर्ष क्रिकेटची निष्ठेने सेवा केल्यावरही क्रिकेटच्या देवाला जर अशाप्रकारे जाब विचारला जात असेल तर ते त्याच्या भक्तांनाही अजिबातच पटणार नाही.