सचिन तेंडुलकरने या खेळाडूबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं
सचिनने या मराठमोळ्या खेळाडूबद्दल काय म्हटलं होतं वाचा...
दुबई : आयपीएल सीजन 13 मध्ये सलग दुसरं अर्धशतक झळकवणारा चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात केकेआरने चेन्नईसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. ऋतुराजने 53 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 72 रन केले. त्याने टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
ऋतुराज गायकवाडचा प्रतिभावान खेळाडू म्हणून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंहने देखील वर्णन केले आहे. त्याचबरोबर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सामना सुरू होण्यापूर्वीच गायकवाडबाबत अंदाज वर्तविला होता. सचिन म्हणाला की, गायकवाड लांब खेळी करण्साठी बनला आहे.
चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर म्हणाला की, 'मी त्याचा फारसा खेळ पाहिला नाही. पण मी जे पाहिले त्यावरुन तो एक उत्कृष्ट फलंदाज दिसतो आहे. त्याने उत्कृष्ट क्रिकेट शॉट्स खेळले आणि सुधारणा केली. जेव्हा एखादा फलंदाज योग्य क्रिकेट शॉट्स खेळण्यास सुरूवात करतो, बॉल कव्हर किंवा मिड विकेटच्या वरुन किंवा थेट गोलंदाजाच्या डोक्यावरुन खेळतो. तेव्हा कळतं की, हा खेळाडू लांब खेळीसाठी बनला आहे.'
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला की, 'मला वाटते की आजच्या सामन्यात तो पुन्हा इनिंगची सुरुवात करेल कारण त्याचे टेक्निक आणि मानसिकता चांगली आहे. धोनी त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल'.