सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन टीम इंडियात
टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अर्जुनची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. अर्जुनची निवड त्याच्या कामगिरीवरुन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन प्रमाणे अर्जुन कामगिरी करणार का, याची उत्सुकता आहे.
सचिन तेंडुलकर बऱ्याचवेळी फिरकी गोलंदाजी करत असे. अर्जुनही गोलंदाजी करतो. मात्र फास्टर बॉलर आहे. ज्युनिअर टीम इंडियाच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंचे एक शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरानंतर काही सामनेही खेळवण्यात आले होते. या सामन्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताचा संघ निवडण्यात आला आहे.
टीम इंडियाचा १९ वर्षांखालील संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन चार-दिवसीय सामने आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. हा दौरा जुलै महिन्यात होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात अर्जुन कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.