मुंबई: दिल्लीतील छात्रसाल स्टेडियमवर झालेल्या कुस्तीपटू हत्या प्रकरणानंतर सुशील कुमार फरार होता. कुस्तीपटू सुशील कुमारला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली असून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रसाल स्टेडियमवर माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूच्या हत्येमध्ये सुशीलचा हात असल्याचा आरोप आहे. मागील काही दिवसांपासून तो फरार होता. दिल्लीच्या कोर्टाने अलीकडेच त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. सुशीलने मंगळवारी रोहिणी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो कोर्टाने फेटाळला.


सुशील कुमार फरार असून त्याची माहिती देणाऱ्यावर दिल्ली पोलिसांनी 1 लाख रुपयांचा इनाम देणार असल्याची घोषणा केली होती. 


4 मे रोजी कुस्तीपटू सागर धनखड याच्यासोबत छात्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमारचा वाद झाला. दोन गटांच्या वादातून सागर धनखडची हत्या करण्यात आली. त्यानंतर सुशील कुमार घटनास्थळावरून फरार झाला होता. सुशीलसोबत असलेल्या काही आरोपींना पोलिसांनी याआधीच बेड्या ठोकल्या होत्या. आता सुशीलला देखील पंजाब पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.