मुंबई : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर सलमान बट्ट हा त्याच्या काळातील एक महान खेळाडू होता. त्याने पाकिस्तानसाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. पण स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर त्याची चमकदार कारकीर्दच उद्ध्वस्त झाली. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटने सलमान बटवर 5 वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर तो (Salman Butt) पाकिस्तानसाठी कधीही खेळू शकला नाही. पण आता या खेळाडूने आपल्या संघावर गंभीर आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज सलमान बटने नुकतेच आरोप केले आहेत. ज्यामध्ये त्याने पाकिस्तान संघात त्याच्या सोबत घडलेल्या गोष्टींचा खुलासा केलाय. 


"हे बघा, मला खेळायचे आहे. मला पुन्हा खेळायचे आहे. पण इथे ज्या पद्धतीने यंत्रणा काम करते, ज्या पद्धतीने निर्णय घेतले जातात, माझ्यावर विश्वास ठेवा, माझं मन आता राहिले नाही. मी २-३ वर्षे धावा करत राहिलो, सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला, सर्वाधिक धावा केल्या. ते ओपनिंग डिपार्टमेंटमध्ये संघर्ष करत होते. परंतु त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं.'


सलमान बट फक्त एवढ्यावरच थांबला नाही. त्याने टीममध्ये ज्या प्रकारचे वातावरण आहे त्यात तुम्ही प्रगती करू शकत नाही असेही सांगितले.
 
“अशा वातावरणात तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आपण जीवनात काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी एक मार्ग निवडतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अडकून म्हातारे होण्याची वाट का पाहावी? मी त्यावेळी 20-22 वर्षांचा नव्हतो, मी 4-5 वर्षे थांबू शकलो नाही. मी हे सगळं पाहिलंय, सगळं केलंय. मी पाकिस्तानसाठी सर्व फॉरमॅटमध्ये जवळपास 140 आंतरराष्ट्रीय सामने खेळलो आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असूनही त्यांना माझ्यासोबत खेळायचे नसेल, तर मी काय बोलू?


सलमान बटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, सलमान बटने पाकिस्तानसाठी 33 कसोटी, 78 वनडे आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 1889, 2725 आणि 595 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 136 धावा ही त्याची सर्वोत्तम फलंदाजी आहे. यासोबतच त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 28 अर्धशतके आणि 11 शतके झळकावली आहेत.