सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारताच्या दोन यशस्वी खेळाडूंपैकी आहेत. मागील काही दशकांमधील भारतातील यशस्वी खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. सानिया भारताची महान महिला टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. तर मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज आहे. मोहम्मद शमीने एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी यांचं नाव जोडलं जात आहे. सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केलं होतं. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांनी घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मोहम्मद शमीचाही घटस्फोट झाला आहे. हसीन जहाँशी त्याचं लग्न झालं होतं. घटस्फोटानंतर हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक आरोप केले आहेत. 


दरम्यान सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी लग्न करणार आहेत या फक्त अफवा आहेत. सानिया मिर्झाचे वडील इम्रान यांनी सर्व दावे फेटाळले आहेत. एनडीटीव्हीशी संवाद साधताना त्यांनी, "हा सगळा मूर्खपणा आहे. ती त्याला साधी भेटलेलीही नाही," असं सांगितलं आहे.


सानिया मिर्झाने अलीकडेच हजच्या पवित्र प्रवासाला सुरुवात केली आहे. पती शोएब मलिकपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर सुमारे 5 महिन्यांनी सानिया मिर्झा हजला गेली आहे. सानियाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. ती अलीकडेच प्रतिष्ठित फ्रेंच ओपन 2024 साठी तज्ज्ञ म्हणून काम करत होती. आपण आता परिवर्तनाचा अनुभव घेण्यासाठी तयार असून, एक चांगली व्यक्ती म्हणून परतण्याची अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.
 
रविवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सानियाने लिहिलं आहे की, "मी या परिवर्तनीय अनुभवाची तयारी करत असताना, कोणत्याही चुकीच्या आणि उणीवांसाठी नम्रपणे क्षमा मागते."  अल्लाह आपली प्रार्थना ऐकले आणि मार्गदर्शन करेल अशी आशाही तिने व्यक्त केली आहे. 


"मी खूप भाग्यवान आणि कृतज्ञ आहे. कृपया मला तुमच्या विचारांमध्ये आणि प्रार्थनेत ठेवा. कारण मी आयुष्यातील महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. मला आशा आहे की मी नम्र अंतःकरणाने आणि मजबूत इमानाने एक चांगला माणूस म्हणून परत येईन."