दुखापत झाल्यानंतरही तो खेळला, आणि सामन्यासोबत प्रेक्षकांची मनही जिंकली
पहिल्या इनिंगमध्ये अरसान नागवासवालाच्या बॉलिंगवर संजू सॅमसनला दुखापत झाली.
कोची : क्रिकेट मॅचदरम्यान अनेकदा खेळाडूंना दुखापत होते. या दुखापतीमुळे काही खेळाडूंना त्या संबंधित सीरिजसाठी किंवा त्या मॅचसाठी मुकावे लागते. पण दुखापत असताना देखील मॅच खेळणारे काही मोजकेच खेळाडू असतात. दुखापत असताना देखील आपल्या टीमसाठी खेळण्यापेक्षा दुसरी कोणीतीच मोठी बाब खेळाडूसाठी नसते. याचाच प्रत्यय केरळमध्ये सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी मॅचदरम्यान आला आहे.
सध्या रणजी ट्रॉफीतील क्वार्टर फायनल मॅचेस सुरु आहेत. यात सध्या केरळ विरुद्ध गुजरात मॅच सुरु आहे. संजू सॅमसन केरळाकडून खेळत आहे. पहिल्या इनिंगमध्ये संजू सॅमसनने ३४ बॉलमध्ये १७ रनवर खेळत होता. त्यादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. पहिल्या इनिंगमध्ये अरसान नागवासवालाच्या बॉलिंगवर संजू सॅमसनला दुखापत झाली. यामुळे त्याला खेळ सोडून (रिटायर्ड हर्ट) जावे लागले.
सामन्याची परिस्थिती
केरळाने पहिल्या इनिंगमध्ये १८५ रन केले. यात संजू सॅमसनच्या १७ रन्सचा समावेश आहे. यानंतर १८५ रन्सचा लक्षाचा पाठलाग करायला आलेल्या गुजरातची पहिली इनिंग १६२ रनांवर संपली. यामुळे केरळला २३ रनची आघाडी मिळाली. केरळसाठी संदीप वॉरियरने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर गुजरातसाठी सर्वाधिक रन पार्थिव पटेलने केल्या. दुसऱ्या इनिंगसाठी जेव्हा केरळचा संघ खेळायला आला तेव्हा त्यांच्या नियमित वेळाने विकेट जात राहिल्या. केरळसाठी जलाल सक्सेना आणि सिजोनम यांच्यात पार्टनरशीप झाली. २३ धावांच्या आघाडीसोबत खेळायला आलेल्या केरळने दुसऱ्या इनिंगमध्ये १७१ रन्स केले, आणि गुजरातला विजयासाठी १९४ रन्सचे आव्हान दिले.
दुखापत असताना देखील संजू सॅमसन आपला टीमसाठी मैदानात उतरला. दुसऱ्या इनिंगमध्ये संजू सॅमसनला विशेष कामगिरी करता आली नाही. पण संघ अडचणीत असताना तो आपल्या दुखापतीला बाजूला सारुन मैदानात आल्याने त्याने क्रिकेट चाहत्यांची वाहवा मिळवली. १९४ रन्सचा पाठलाग करायला आलेल्या गुजरात संघाला, केरळच्या बासिल थंपी आणि संदीप वॉरियर यांच्या भेदक माऱ्यासमोर टिकता आले नाही. गुजरातच्या ९ फलंदाजाना तर दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. राहुल शाहने एकाकी ३३ रन्सची खेळी केली. पण याचा काही विशेष फरक पडला नाही. गुजरातची दुसरी इनिंग ८१ रन्सवर ऑलआऊट झाली आणि केरळने ११३ रन्सने विजय प्राप्त केला.