मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ऋषभ पंतला धोक्याचा इशारा दिला आहे. ऋषभ पंतकडे चांगली प्रतिभा आहे, पण संजू सॅमसन त्याच्यापुढे आव्हान उभं करत आहे, असं गौतम गंभीर म्हणाला. तसंच संजू सॅमसन हा ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो, असंही गंभीरला वाटत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये गंभीरने हे सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही ऋषभ पंतला इशारा दिला होता. जबाबदारी दाखव, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असं रवी शास्त्री पंतला म्हणाले होते. कौशल्य असो वा नसो, ऋषभ पंत असे शॉट खेळून फक्त स्वत:लाच नाही, तर टीमलाही निराश करत आहे, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं होतं. 


गौतम गंभीरने मनिष पांडे आणि श्रेयस अय्यरचंही कौतुक केलं आहे. मनिष पांडे २९ वर्षाचा असला तरी तो त्याच्या वयापेक्षा लहान वाटतो. तर श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजमध्ये त्याचं कौशल्य दाखवलं. मर्यादित ओव्हरच्या मॅचमध्ये केएल राहुलही मजबूत आहे, असं गंभीर म्हणाला.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली धर्मशालामधली पहिली टी-२० पावसामुळे रद्द झाली. आता दुसरी वनडे उद्या बुधवारी मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही मॅच जिंकली नाही. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यात हे रेकॉर्ड पुसून टाकण्याचा प्रयत्न विराट आणि त्याची टीम करेल.


दक्षिण आफ्रिका याआधी भारतात २०१५ साली ३ टी-२० मॅचची सीरिज खेळली होती. यामध्ये टीम इंडियाचा ०-२ने पराभव झाला होता. त्या सीरिजमधलीही एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती.


मोहालीमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत २ टी-२० मॅच खेळल्या आहेत. यातल्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. भारताने या मैदानात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे.