इम्रान खानना अजून सलतोय वर्ल्ड कपमधला भारताविरुद्धचा पराभव
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.
इस्लामाबाद : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या पराभवाचा २ महिन्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना त्रास होत आहे. या पराभवावरून इम्रान खान यांनी पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंग घ्यावी, असा सल्ला इम्रान खाननी या मॅचआधीच सरफराजला दिला होता. पण सरफराजने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेतली.
एका कार्यक्रमात बोलताना इम्रान खान म्हणाले, 'तुम्ही पराभवाला घाबरलं नाही पाहिजे. पराभवाच्या भीतीने तुमची रणनिती एकदम वेगळी, नकारात्मक आणि बचावात्मक असते, जसं वर्ल्ड कपमध्ये आमच्या कर्णधाराने केलं. तुम्ही टॉस जिंकून दुसऱ्या टीमला बॅटिंग देण्याऐवजी पहिले बॅटिंग घेतली पाहिजे. हे सगळं मानसिकतेवर अवलंबून आहे.'
टॉस जिंकून पहिले बॅटिंग करताना भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी २३ ओव्हरमध्ये १३६ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. रोहितने केलेल्या १४० रनमुळे भारताने ५० ओव्हरमध्ये ३३६ रनचा टप्पा गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला वारंवार धक्के लागले, त्यामुळे भारताने ही मॅच डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ८९ रननी जिंकली.
या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर जोरदार टीका करण्यात आली होती. 'मॅचच्या ३ दिवस आधीपासून मॅनचेस्टरमध्ये पाऊस पडत होता. डकवर्थ लुईस नियमाचा फायदा दुसरी बॅटिंग करणाऱ्या टीमला होतो, म्हणून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला,' असं तेव्हा सरफराज म्हणाला होता. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभव झालेला नाही. आतापर्यंत ७ वेळा वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामने झाले. या सातही मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे.