Sarfaraz Khan: शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले...
Sarfaraz Khan: ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली.
Sarfaraz Khan: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील तिसरा टेस्ट सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येतोय. हा सामना मुंबईकर सरफराज खानसाठी फार महत्त्वपूर्ण मानला जातोय. याचं कारण म्हणजे या सामन्यात सरफराज खानने डेब्यू केलं आहे. दरम्यान ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली.
टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये सरफराजचा समावेश
इंग्लंडविरुद्धच्या राजकोट टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये सरफराज खानचाही समावेश करण्यात आला होता. दीर्घकाळापासून टीम इंडियात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरफराजसाठी 15 फेब्रुवारीचा दिवस फार महत्त्वाचा ठरला. सर्फराजला टीम इंडियाचे अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी डेब्यूची कॅप दिली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याचं अभिनंदन केले.
सरफराजच्या डेब्यूवेळी त्याचं कुटुंबीयही मैदानावर उपस्थित होते. यामध्ये त्याचे वडील नौशाद आणि पत्नी होते. सरफराजच्या डेब्यूवर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्याला शुभेच्छा दिल्या.
माझ्या मुलाची काळजी घ्या
सरफराज खान आणि त्याच्या कुटुंबासाठी हा क्षण खूप भावूक होता. यावेळी नौशाद खान यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. यावेळी जेव्हा रोहित शर्मा सरफराजच्या वडिलांना भेटायला आला तेव्हा ते म्हणाले की, आता माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतोय, त्याची काळजी घ्या.
यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही प्रत्युत्तर दिलं की, तुम्हाला त्याची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आम्हाला कल्पना आहे तुम्ही काय केलंय. सरफराज खानसाठी तुम्ही किती मेहनत घेतली हे आम्हाला माहीत आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर रोहितनेही सरफराजच्या पत्नीशी हात मिळवत तिचं अभिनंदन केलं..
सरफराज खानची पहिल्याच सामन्यात उत्तम फलंदाजी
राजकोट टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये सरफराज खानला फलंदाजीची संधी मिळाली. यावेळी मैदानावर येताच त्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे स्पिनर गोलंदाजांसमोर मोठे शॉट खेळण्यास तो अजिबात घाबरला नाही. सरफराजने टेस्ट कारकिर्दीतील पहिल्या डावात केवळ 48 बॉल्समध्ये 50 रन्स पूर्ण केले होते. मात्र जडेजाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तो रन आऊटचा शिकार झाला.