मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीने कसोटी टीमचं कर्णधारपद सोडलं. भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीच्या या निर्णयाचे बीसीसीआयने स्वागत केलं आहे. शिवाय हा निर्णय कोहलीचा असल्याचंही बीसीसीआयने म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, बोर्ड सचिव जय शाह यांनी शनिवारी विराट कोहलीबद्दल ट्विट केलं आणि कर्णधार म्हणून त्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.


यानंतर आता बीसीसीआयकडून विराट कोहली आणि त्याच्या निर्णयासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार म्हणून आणि कारकिर्दीबद्दल आम्ही त्याचं अभिनंदन करतो. बीसीसीआय आणि निवड समिती विराट कोहलीच्या या निर्णयाचा आदर करतो."


बीसीसीआयने त्यांच्या रिलीजमध्ये म्हटलं आहे की, "विराट कोहली भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरलाय. महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विराट कोहलीने 68 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद केलं, त्यापैकी त्याने 40 सामने जिंकले. यादरम्यान विराट कोहलीची विजयाची टक्केवारी 58.82 टक्के होती. कर्णधार म्हणून विराट कोहलीने श्रीलंकेत पहिली मालिका जिंकली होती."


बीसीसीआयने सांगितलं की, "विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका जिंकली, वेस्ट इंडिजचा पराभव केला, कसोटीत प्रथम क्रमांकाचं स्थान पटकावलं आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विराट कोहलीने घरच्या मैदानावर 31 सामन्यांचं नेतृत्व केलं यामध्ये 24 जिंकले आणि केवळ 2 सामने गमावलेत"


कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने दिलेल्या योगदानाबद्दल मला आभार मानायचेत, असं विधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलंय. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये यश मिळवलंय. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि बीसीसीआय त्याचा आदर करते. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो, असंही गांगुली म्हणालेत.