VIDEO : `धोनीचं लग्न होतं पण...`, सुरेश रैनाने सांगितला देहराडूनमधील लग्नाचा किस्सा!
MS Dhoni Wedding Story : क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील रैना आणि धोनीची केमिस्ट्री पहायला मिळते. धोनीने त्याला कशाप्रकारे लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा किस्सा रैनाने (Suresh Raina) एका मुलाखतीत सांगितला आहे.
Suresh Raina On MS Dhoni : टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहित आहे. धोनीने जेव्हा निवृत्ती घेतली, तेव्हा रैनाने देखील तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. यावरून या दोन्ही खेळाडूंमधील बॉडिंग दिसून येते. दोन्ही खेळाडूंनी आत्तापर्यंत अनेक सामन्यामध्ये विजय मिळवून दिला होता. क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील रैना आणि धोनीची केमिस्ट्री पहायला मिळते. अशातच 2010 साली सुरेश रैना जेव्हा लखनऊमध्ये होता, तेव्हा धोनीने त्याला फोन केला होता. त्यावेळी धोनीने त्याला कशाप्रकारे लग्नाचं (MS Dhoni Wedding ) आमंत्रण दिलं होतं. त्याचा किस्सा रैनाने एका मुलाखतीत सांगितला आहे.
काय म्हणाला सुरेश रैना?
मी लखनऊला असताना धोनी भाईचा मला फोन आला. त्यांनी आधी मला विचारलं की, तू कुठं आहेस? मी त्याला सांगितलं मी लखनऊमध्ये आहे. त्यावेळी त्याने सांगितलं की, माझं लग्न आहे, लग्नाला ये...! तू देहराडूनला ये आणि शांतपणे ये, कोणाला काही सांगू नकोस, मी इथं तुझी वाट बघतोय, असं धोनी भाईने सांगितलं. त्या फोननंतर मी घाईघाईने गेलो. मला लग्नात घालायला कपडे देखील नव्हते. मी धोनीच्या लग्नात त्याचे कपडे घातले होते, असा किस्सा रैनाने सांगितला.
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने जुलै 2010 मध्ये साक्षीसोबत लग्न केले. त्यावेळी सुरेश रैना व्यतिरिक्त, आशिष नेहरा, आरपी सिंग, हरभजन सिंग आणि रोहित शर्मा यांनी लग्नात हजेरी लावली होती. धोनीने लग्नानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं अन् श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने नवी उंची गाठल्याचं दिसून आलं.
पाहा Video
दरम्यान, सुरेश रैना धोनीच्या जवळचा मित्र मानला जातो. मी महेंद्रसिंग धोनीसाठी खेळलो आणि नंतर देशासाठी खेळलो, तो एक महान खेळाडू आणि एक अद्भुत व्यक्ती आहे. माझा त्याच्याशी खास संबंध आहे. माझी आणि महेंद्रसिंग धोनीची कहाणी सारखीच आहे, मी गाझियाबादसारख्या छोट्या शहरातून आलो होतो आणि एमएस धोनी देखील रांचीमधून आला होता. मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, असं सुरेश रैना याने म्हटलं होतं.