मुंबई : भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांचा सन्मान म्हणून सैनिकांसारखी टोपी घातली होती. एवढच नाही तर खेळाडूंनी त्यांचं मॅचचं मानधन राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी दिलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय टीमचं सैन्याची टोपी घालणं जास्तच झोंबलं होतं. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका लागला आहे. भारतीय टीमने लष्कराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिकांसारखी टोपी घातली होती, आणि आयसीसीनं याला परवानगी दिली होती, असं खुद्द आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमने ही टोपी घालून खेळण्याबद्दल पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीला विचारलं. यावेळी शाहिद आफ्रिदीने विनोद करून यावर उत्तर देणं टाळलं. 'भारतीय टीमने टोपी घातली मग काढली पण', असं म्हणून शाहिद आफ्रिदी हसला.



पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्सच्या टीमवर विजय मिळवल्यानंतर शाहिद आफ्रिदी पत्रकार परिषदेसाठी आला. यावेळी पत्रकारांनी शाहिद आफ्रिदीला भारतीय टीमने आर्मी कॅप घातल्याबद्दल प्रश्न विचारला. यावेळी टीमचे मॅनेजर नदीम खान यांनी हस्तक्षेप केला आणि फक्त पीएसएलबद्दल प्रश्न विचारा असा आग्रह धरला.


तर भारतीय टीमचे बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण यांनी या मुद्द्यावरून भारतीय टीमचे समर्थन केले आहे. 'देशासाठी जे करायला पाहिजे होतं, ते आम्ही केलं. लष्करानं देशासाठी जे केलं आहे, त्याचा सन्मान करण्याचा आमचा उद्देश होता', असं भरत अरुण म्हणाले.


पाकिस्तान तोंडावर आपटलं


भारताने आर्मी कॅप घालून मैदानात उतरल्याबद्दल पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीला पत्र लिहून अशाप्रकारे टोपी घालण्याबद्दल भारतीय टीमवर कारवाईची मागणी केली होती. 'वेगळ्या उद्देशासाठी त्यांनी आयसीसीची परवानगी मागितली होती, पण भलत्याच कारणासाठी याचा उपयोग केला गेला, भारतीय टीमच्या या भूमिकेचा स्वीकार होऊ शकत नाही', अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मणी यांनी दिली होती.


याबद्दल आयसीसीचे महाप्रबंधक क्लेरी फुर्लोग म्हणाले 'बीसीसीआयने पैसे गोळा करण्यासाठी आणि शहीद सैनिकांचा सन्मान म्हणून टोपी घालण्यासाठी परवानगी मागितली होती आणि आम्ही अशी परवानगी दिली होती.' आयसीसीच्या या प्रतिक्रियेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडावर आपटलं होतं.