ढाका : बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकीब अल हसन याचं आयसीसीने २ वर्षांसाठी निलंबन केलं आहे. बुकींनी मॅच फिक्सिंगसाठी तीन वेळा संपर्क साधल्यानंतरही शाकीबने याची माहिती आयसीसीला दिली नाही, यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला बुकींनी संपर्क केला तसंच मॅच फिक्सिंग करण्याची ऑफर दिली, तर याची माहिती आयसीसीला देणं बंधनकारक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाकीब अल हसनने त्याच्यावर झालेले आरोप मान्य केले आहेत. २ वर्षांसाठी निलंबन होणं हे वेदनादायी आहे. पण मी बुकींनी साधलेल्या संपर्काबद्दल आयसीसीला माहिती दिली नाही. मी माझं कर्तव्य बजावलं नाही. प्रत्येक क्रिकेटपटू आणि चाहत्याप्रमाणेच मलाही क्रिकेट भ्रष्टाचारमुक्त हवं आहे, असं शाकीब म्हणाला आहे. शाकीबला २ वर्षांची शिक्षा झाली होती, पण त्याने बुकींनी त्याच्याशी संपर्क केल्याचा आरोप मान्य केला, त्यामुळे त्याचं निलंबन एक वर्षांनी कमी करण्यात आलं आहे. २९ ऑक्टोबर २०२०ला शाकीब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकतो. 


आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार शाकीबला ३ वेळा बुकींनी संपर्क केला होता. यामध्ये जानेवारी २०१८ साली बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या ट्राय सीरिजवेळी शाकीबला २ वेळा आणि आयपीएलमध्ये २६ एप्रिल २०१८ला हैदराबाद आणि पंजाब या मॅचवेळीही बुकीने संपर्क साधला होता.