ढाका : बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकीब अल हसन संकटात सापडला आहे. आधीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अटींचं उल्लंघन केल्यामुळे शाकीबला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दुसरीकडे आता आयसीसीकडूनही शाकीबवर कारवाई होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगाली दैनिक 'समकाल'ने दिलेल्या वृत्तानुसार एका बुकीने मॅच फिक्सिंगसाठी शाकीबकडे संपर्क केला, पण शाकीबने याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीला दिली नाही, त्यामुळे शाकीबवर कारवाई होऊ शकते. शाकीबने मात्र फिक्सिंगची ऑफर धुडकावली होती.


शाकीबला सरावापासून लांब ठेवण्याचे आदेश आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिले आहेत. आयसीसीच्या निर्णयानंतर शाकीबचं जवळपास १८ महिने निलंबन होऊ शकतं. अजून कोणतीही गोष्ट स्पष्ट झालेली नाही आणि हाच अडचणीचा मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले. बांगलादेशची टीम बुधवारी भारत दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. शाकीब भारत दौऱ्यातून बाहेर राहू शकतो, असं हसन सोमवारीच म्हणाले होते.


शाकीब अल हसन ग्रामीणफोनचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर झाला. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केलेल्या करारानुसार करारबद्ध असणारा कोणताही खेळाडू टेलीकॉम कंपनीशी करार करु शकत नाही. त्यामुळे शाकीबला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शाकीबने या नोटीसचं उत्तर अजूनही दिलेलं नाही. तेव्हापासूनच शाकीब टीमच्या सरावातही दिसला नाही. शाकीबने समाधानकारक उत्तर दिलं नाही, तर त्याच्यावर कडक कारवाई होईल, असा इशारा नजमुल हसन यांनी दिला आहे.


भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ टी-२० मॅच आणि २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. रविवारी दिल्लीच्या मैदानामध्ये पहिली टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे.