सेंट लुशिया : इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर केलेली समलैंगिकतेची टीका विंडीजचा फास्ट बॉलर शेनॉन गॅब्रियलला चांगलीच भोवली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार गॅब्रियलवर ४ वनडे मॅचची बंदी घालण्यात आली आहे. सेंट लुशियामध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये गॅब्रियलनं रूटवर टीका केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडीज आणि इंग्लंडमधल्या तिसऱ्या टेस्टमध्ये गॅब्रियल आणि रूट यांच्यामध्ये बाचाबाची झाली. रूट आणि गॅब्रियल यांच्यामध्ये झालेल्या वादावादीचा आवाज स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाला आहे. 'याचा वापर कोणाचा अपमान करण्यासाठी करू नका, गे(समलैंगिक) असण्यामध्ये काहीच वाईट नाही', असं उत्तर रूटनं गॅब्रियलला दिल्याचं स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं.


मैदानातले अंपायर कुमार धर्मसेना आणि रॉड टकर यांनी याबाबत तक्रार केली, आणि मग आयसीसीच्या कलम २.१३ नुसार गॅब्रियलवर कारवाई करण्यात आली. आयसीसीच्या नियमावली आणि आचार संहितेनुसार आंतरराष्ट्रीय मॅचदरम्यान कोणत्याही खेळाडूनं प्रतिस्पर्धी खेळाडू, अंपायर, मॅच रेफ्री आणि टीम प्रशासनातल्या व्यक्ती यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यास कारवाई करण्यात येते.


रूटवर टीका केल्यामुळे गॅब्रियलचं ७५ टक्के मानधनही कापण्यात आलं आहे. तसेच त्याला ३ डिमेरीट पॉईंटही देण्यात आले आहेत. २४ महिन्यांमध्ये गॅब्रियलचे ८ डिमेरीट पॉईंट झाले आहेत. यामुळे त्याचं आपोआप २ टेस्ट किंवा ४ वनडे किंवा ४ टी-२० साठी निलंबन होणार आहे. यामध्ये वनडे सीरिज पहिले असल्यामुळे त्याला ४ वनडे मॅचला मुकावं लागणार आहे.


३० वर्षांच्या शॅनन गॅब्रियल याचं विंडीजच्या वनडे टीममध्ये पुनरागमन झालं होतं. पण पुढच्या आठवड्यापासून बार्बाडोसमधून सुरु होणाऱ्या पहिल्या ४ वनडे मॅचना गॅब्रियल मुकणार आहे.


याआधीही प्रतिस्पर्धी खेळाडूला स्पर्श केल्यामुळे गॅब्रियलला ५ डिमेरीट पॉईंट देण्यात आले होते. एप्रिल २०१७ साली पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये सरफराज अहमदच्या जाणूनबुजून मध्ये आल्यामुळे गॅब्रियलला ३ डिमेरीट पॉईंट देण्यात आले. तसंच नोव्हेंबर २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्ध चिटगाँग टेस्टमध्ये इमरूल कायेस याच्यासोबतही अशीच घटना घडल्यामुळे गॅब्रियलला २ डिमेरीट पॉईंट देण्यात आले. त्यावेळी ४ पेक्षा जास्त डिमेरीट पॉईंट झाल्यामुळे गॅब्रियलचं मिरपूर टेस्टमधूनही निलंबन झालं होतं. 


इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणतो, गे असणं गैर नाही