ब्रिस्टल : भारत आणि इंग्लंड महिला संघात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) सलामीची फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) इतिहास रचला आहे. भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. पण शेफाली वर्मा या महिला क्रिकेटपटूचं अगदी कमी वयात भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.


शेफालीच्या नावावर नवा विक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरताच शेफालीच्या नावावर नवा विक्रम जमा झाला. क्रिकेटच्या तिनही प्रकारात प्रतिनिधत्व करणारी शेफाली भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंपैकी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली आहे. मुळची हरियाणाची असलेल्या शेफालीने कसोटी आणि टी२० क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. शेफालीने आज भारतातर्फे एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं, तिचं वय 17 वर्षे 150 दिवस आहे. त्यामुळे 18 वर्षांपेक्षा कमी वयात भारताचं तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व करणारी शेफाली ही पहिली आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.



शेफालीचा पहिला एकदिवसीय सामना


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शेफालीने 14 चेंडूत 15 धावा केल्या. ज्यात 3 चौकारांचा समावेश आहे. कॅथरीन ब्रंटने (Katherine Brunt) ने शेफालीची विकेट घेतली. शेफालीने वयाच्या 16 व्या वर्षी भारताकडून दक्षिण आफ्रिके महिला संघाविरुद्ध टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शेफालीने 3 अर्धशतकांसह 617 धावा केल्या आहेत. तर 16 जून 2021 रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं होते. कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावात तिने अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली होती. पहिल्या डावात तिने 96तर दुसऱ्या डावात 63 धावा केल्या होत्या. 


सचिनकडून क्रिकेट खेळण्याची प्रेरणा


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना हा हरियाणामधील लाहलीमध्ये खेळला होता. त्यावेळी 10 वर्षांची शेफाली हि प्रेक्षकांमध्ये बसली होती. सचिनचा खेळ पाहून शेफालीने भारतीय संघासाठी खेळण्याचं निश्चित केलं. एका मुलाखतीत तिने आपल्या क्रिकेटमधील प्रवासाविषयी माहिती दिली होती. सचिन तेंडुलकरला पाहूनच मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाल्याचं तिनं या मुलाखतीत म्हटलं होतं.