शिखर धवनने स्विकारली युवराज सिंगची ऑफर, गब्बर आता `या` संघाकडून खेळणार
Shikhar accepted Yuvraj offer : शिखर धवन सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) खेळणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
Shikhar Dhawan In Legends League Cricket : मिस्टर आयसीसी म्हणून ओळख असलेल्या शिखर धवनने कोणताही गाजा वाजा न करता निवृत्ती जाहीर केली. शांत अन् हसमुख चेहऱ्याने शिखरने आपल्या 13 वर्षांच्या कारकीर्दीला ब्रेक लावला. टीम इंडियाचा सर्वात धाकड सलामीवीर फलंदाज म्हणून ओळख असलेल्या गब्बरने म्हणजेच शिखर धवनने भारतासाठी अनेक सामने एकहाती जिंकवले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शिखरचं वादळी फलंदाजी कुणीही विसरू शकत नाही. मात्र, आता शिखर भारतीय संघासोबत दिसणार नाही. पण शिखरने चाहत्यांना नाराज न करता मोठं गिफ्ट दिलंय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता शिखर पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. होय, पण लिजेंड टीम इंडियाकडून... वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये शिखरची बॅट इंडिया चॅम्पियन्सकडून कडाडणार आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर शिखरला इंडिया चॅम्पियन्सचा कॅप्टन युवराज सिंगने ऑफर दिली होती. ती ऑफर आता गब्बरने स्विकारली आहे. युवराजने पोस्ट करत ही ऑफर दिली होती. त्यानंतर आता शिखर धवन सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
काय म्हणाला होता युवराज सिंग?
आयुष्यात मिळालेल्या सर्व संधीचा तू पूर्ण फायदा घेतलास. मैदानावर आणि मैदानाबाहेरही नेहमी 100 टक्कांपेक्षा जास्त योगदान दिलंय. आयसीसी टूर्नामेंटमध्ये तुझ्या निडर खेळीने आणि मॅचविनिंद प्रदर्शनामुळे तु खऱ्या अर्थाने ‘गब्बर’ झाला होता. त्यामुळे कदाचित विरोधी संघही तुला घाबरत होते. तुझ्या करियरमध्ये जे काही मिळवलं त्यावर तुला नेहमी गर्व असायला हवा. आता दुसरीकडे तुझं स्वागत आहे, लिजेंड क्रिकेट खेळायला ये, असं युवराज सिंगने पोस्ट करत म्हटलं होतं.
शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शिखर धवन टीम इंडियासाठी 34 कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने 2315 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 5 अर्धशतकं ठोकली असून 190 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर 167 एकदिवसीय सामन्यात शिखरच्या नावावर 6793 जमा आहेत. यात तब्बल 17 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने 11 शतकांसह 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1759 धावा केल्या आहेत. भारताचा हुकमी सलामीवीर अशी शिखर धवनची ओळख होती.