कश्मीरवर वक्तव्य करणाऱ्या आफ्रिदीला धवनचं सडेतोड उत्तर
भारतीय क्रिकेटर आफ्रिदीवर भडकले
मुंबई : पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत वक्तव्य केल्यानंतर भारतीय क्रिकेटर चांगलेच भडकले आहेत.
आफ्रिदीने क्रिकेट बोर्डाकडे मागणी केली होती की, पाकिस्तान क्रिकेट लीगसाठी काश्मीरच्या नावाने एक लीग तयार करुन काश्मीरची मदत करावी. शाहिद आफ्रिदीने कर्णधार म्हणून या टीमचं नेतृत्व करण्यास तयार असल्याचं देखील म्हटलं आहे.
भारतीय क्रिकेटर देखील यानंतर पुढे आले आहेत. त्यांनी आफ्रिदीच्या या वक्तव्याला जोरदार उत्तर दिलं आहे. टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन याने म्हटलं की, 'सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. यावेळी देखील तुम्हाला काश्मीरची पडलेली आहे. काश्मीर आमचं आहे, आमचं होतं आणि आमचंच राहणार. हवं तर 22 कोटी घेऊन या, आमचा एक सव्वा लाखाच्या बरोबरीचा आहे. बाकी तुम्ही मोजून घ्या.'
याआधी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने देखील आफ्रिदीला चांगलंच सुनावलं होतं. 'पाकिस्तानकडे 7 लाख फोर्स आहे. 20 कोटी जनता आहे. असं 16 वर्षाचा आफ्रिदी म्हणतो आहे. 70 वर्षापासून काश्मीरची भीक मागत आहेत. आफ्रिदी सारख्या जोकर, इमरान आणि बाजवा भारत आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात विष कालवतात. पाकिस्तानी जनतेला मूर्ख बनवतात. पण त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत काश्मीर मिळणार नाही.'
याआधी देखील आफ्रिदीने मोदींबद्दल वक्तव्य केलं होतं.