मुंबई  : World cup 2019 क्रिकेट विश्वचषकाअंतर्गत भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्याचा उत्साह क्रीडा विश्वात शिगेला पोहोचला असतानाच शिवसेनेकडून मात्र या सामन्याचा विरोध करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी याविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादी हल्ले करणाऱ्यांसोबत क्रिकेट खेळूच नये असं म्हणत याविरोधात आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


रक्तपात करणाऱ्यांसोबत क्रिकेट सामने नकोच 


दहशतवादी हल्ले करणाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळण्याची गरज नाही. शिवाय त्यासोबतच त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याचीही गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानविरोधी भूमिका घेण्याची शिवसेनेची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शिवसेनेकडून अशीच भूमिका घेण्यात आली आहे. ज्याअंतर्गत पाकिस्तानविरोधातील कोणत्याही संबंधांचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. 


दोन्ही देशांचे तणावपूर्ण संबंध 


भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारे तणावपूर्ण संबंध पाहता त्याचे थेट पडसाद सर्वच क्षेत्रांवर पडताना दिसत आहेत. १४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर तर, ही परिस्थिती आणखी चिघळली. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून समर्थन मिळणाऱ्या या कारवायांचा सर्वक्षेत्रांतून विरोध करण्यात आला. परिणामी दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांमध्येही तेढ निर्माण झाली. त्यामुळेच पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारतातून वारंवार विरोध केला जात आहे. ज्यामध्ये विश्वचषकातील क्रिकेट सामन्याचाही समावेश आहे.