कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलण्यास गांगुलीचा नकार, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वैदी यांनी सुनावलं, म्हणाल्या `हे असले हिरो...`
Priyanka Chaturvedi on Sourav Ganguly: दिल्लीतील (Delhi) जंतर मंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटू आंदोलन करत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) त्यावर कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वैदी (Priyanka Chaturvedi) यांनी त्याच्यावर टीका केली आहे.
Priyanka Chaturvedi on Sourav Ganguly: दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटू धरणं आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI president Brij Bhushan) यांच्याविरोधात कुस्तीवीर आंदोलन करत असून त्यांनी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याचा त्यांचा आरोप आहे. यादरम्यान 3 मार्चला पोलिसांसोबत वाद झाल्याने हे प्रकरण आणखीनच चिघळलं आहे. मात्र कुस्तीपटूंच्या आंदोलनावर अनेक मोठ्या खेळाडूंनी मौन बाळगलं आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) यावर मांडलेल्या भूमिकेवरुन टीका होत आहे. टीका करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वैदी (Priyanka Chaturvedi) यांचाही समावेश आहे.
"इतकी लाज खाली.....", विनेश फोगाट ढसाढसा रडली; म्हणाली "हेच दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?"
सौरव गांगुलीने आपल्याला कुस्तीपटूंच्या आंदोलनाबद्दल जास्त माहिती नसून, हे प्रकरण लवकर शांत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सौरव गांगुलीने कुस्तीपटूंना त्यांची लढाई लढू दे असं विधान केलं आहे. यानंतर ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वैदी यांनी त्यांच्यावर टीका केली असून, हिरो नेहमी असे खाली कोसळतात असं म्हटलं आहे.
सौरव गांगुलीने काय म्हटलं आहे?
सौरव गांगुलीला एका कार्यक्रमात कुस्तीपटूंच्या आंदोनलाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने म्हटलं की, "त्यांना त्यांची लढाई लढू दे. तिथे काय सुरु आहे मला माहिती नाही. मी फक्त वृत्तपत्रात वाचलं आहे. क्रिकेटविश्वात मला एक गोष्ट समजली आहे, ती म्हणजे ज्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नाही त्यावर जास्त बोलू नये".
प्रियंका चतुर्वैदी यांची टीका
सौरव गांगुलीच्या या विधानावर खासदार प्रियंका चतुर्वैदी यांनी टीका केली आहे. "हिरोही खाली पडतात, दर दिवशी. आता बोलणाऱ्यांच्या मौनाचे कारण समजले आहे. ही आमची लढाई नाही मग भूमिका का घ्यायची?", असं ट्वीट प्रियंका चतुर्वैदी यांनी केलं आहे.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI president Brij Bhushan) यांना अटक करण्याची मागणी करत साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट असे अनेक मोठे कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंग यांनी अनेक महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, दिल्ली पोलिसांनी सात तक्रारदारांचा जबाब नोंदवला आहे. जोपर्यंत बृजभूषण सिंग यांना अटक होत नाही, तोपर्यंत जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याची कुस्तीपटूंची भूमिका आहे.
बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन करण्याची ही दुसरी वेळ आहे. आंदोलनादरम्यान विनेश फोगाटने क्रिकेटपटूंकडून मौन बाळगलं जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दुसरीकडे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी आंदोलनावर टीका केली आहे.