`पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,` शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला `उगाच आपली छप्परफाड...`
बीसीसीआयने (BCCI) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघात पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. यावर्षीच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे.
सध्याच्या घडामोडी पाहता क्रिकेट चाहत्यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेमुळे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. केंद्र सरकारन हिरवा कंदील दिला नसल्याने बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात प्रवास करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 चं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आम्ही हायब्रीड मॉडेल स्विकारणार नसल्याचं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काही अटींसह भारताचे सामने दुबईत होणार असल्याच्या हायब्रिड मॉडेलचा अवलंब करण्यास पाकिस्तान बोर्डाने कथितपणे सहमती दर्शविल्यानंतर आशेचा किरण दिसला होता. पण सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय बोर्डाने पाकिस्तानच्या अटी नाकारल्या आहेत ज्यात पीसीबीने भारतात आयसीसी इव्हेंट्ससाठी देखील तेच हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास सांगितलं होतं.
या सर्व घडामोडींदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेट संघाची पाकिस्तानात खेळण्याची इच्छा आहे, मात्र त्यांना परवानगी दिली जात नाही आहे असा दावा केला आहे.
"भारतीय संघाची मनापासून पाकिस्तानात खेळण्याची इच्छा आहे. विराट कोहली तर पाकिस्तानात खेळण्यासाठी मनापासून इच्छुक असेल. मला माहिती आहे काय सुरु आहे. जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला तर टीव्ही हक्क स्पॉन्सरशिप छप्परफाड असेल. मी तुम्हाला हे सांगत आहे. ते सरकारमुळे येत नाही आहेत," असा दावा शोएब अख्तरने टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान केला आहे.
दरम्यान, आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्राधान्यक्रमांची रूपरेषा सांगितली ज्यात लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक गेम्समध्ये खेळाच्या समावेशाचा एक संधी म्हणून फायदा घेणे आणि आणखी वेग वाढवणे समाविष्ट आहे. तसंच महिलांच्या खेळात प्रगती करण्याचा हेतू आहे.
तथापि, Cricbuzz च्या रिपोर्टनुसार, जय शाह यांनी 5 डिसेंबर रोजी व्हर्च्युअल बोर्ड मीटिंग बोलावली आहे. पण या बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीवर काही चर्चा होणार की नाही हे या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेले नाही.