World Cup 2019: भारताला पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा अधिकार- शोएब अख्तर
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
रावळपिंडी : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची भावना आहे. लवकरच होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये, अशी भावना व्यक्त होत आहे. भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. आता या मुद्द्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं त्याचं मत मांडलं आहे.
पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये भारताला न खेळण्याचा संपूर्ण अधिकार आहे, पण या गोष्टीवरून राजकारण होता कामा नये, असं शोएब अख्तर म्हणाला. शोएब अख्तरनं पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'ज्या देशानं भारतासोबत वाईट केलं, त्यांच्याविरुद्ध खेळायला नकार देण्याचा अधिकार भारताला आहे. पण माजी भारतीय क्रिकेटपटू ज्या पद्धतीनं क्रिकेटला राजकारणाशी जोडत आहेत, ते चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरनं एका चॅनलशी बोलताना दिली.
शोएबकडून इम्रान खानचं समर्थन
शोएब अख्तरनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं समर्थन केलं आहे. 'भारतीय जवानांना वाईट परिस्थितीतून जावं लागलं, याचं मला दु:ख आहे. पण माझ्या देशाची गोष्ट निघत असेल, तर आमच्यामध्ये एकता आहे. आम्ही आमच्या पंतप्रधानांच्या बोलण्याचं समर्थन करतो', असं शोएब म्हणाला.
पुलवामा हल्ला : शाहिद आफ्रिदीची टिवटिव, इम्रानच्या सुरात सूर
'भारतावर हल्ला झाला'
'भारतावर हल्ला झाला आहे, आपण यावर वाद घालू शकत नाही. भारताला पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा पूर्ण अधिकार आहे,' असं मत शोएबनं व्यक्त केलं.
भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रिया
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधली नियोजित मॅच १६ जूनला खेळवण्यात येईल. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सौरव गांगुली, हरभजन सिंग आणि अजहरुद्दीन यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
'जर आपण पाकिस्तानशी द्विपक्षीय सीरिज खेळत नसू, तर वर्ल्ड कपमध्येही त्यांच्याविरुद्ध खेळायची गरज नाही. देशापेक्षा वर्ल्ड कप मोठा असू शकत नाही. जर तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध खेळायचं असेल, तर सगळीकडे खेळा. जर खेळायचं नसेल, तर कुठेच खेळू नका', असं अजहरुद्दीन म्हणाला.
वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. पाकिस्तानविरुद्ध खेळलं नाही तरी भारताला वर्ल्ड कप जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही, कारण या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे, असं मत सौरव गांगुली आणि हरभजननं व्यक्त केलं. पण सेमी फायनल आणि फायनलमध्ये जर पाकिस्तानविरुद्धची मॅच असेल, तरी भारतानं आपली न खेळण्याची भूमिका कायम ठेवावी, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली.
सुनील गावसकर यांनी मात्र भारताच्या इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळं मत व्यक्त केलं. पाकिस्तानविरुद्ध न खेळून आपण त्यांना फुकटचे अंक का द्यायचे? यापेक्षा नेहमीप्रमाणे पाकिस्तानला हरवून त्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपवण्यासाठी आपल्याला मदत होईल, असं गावसकर यांना वाटतं.