सचिन नाही तर `या` फलंदाजाच्या नावाने शोएब अख्तरच्या मनात भरते धडकी!
हा तुफान गोलंदाजही काही फलंदाजांना घाबरत होता याची तुम्हाला कल्पना आहे का?
मुंबई : पाकिस्तानचा रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला शोएब अख्तरला अनेक फलंदाज घाबरायचे. त्याच्या गोलंदाजीचा वेग प्रत्येक फलंदाजाला खेळातच येईल असं नाही. मात्र हा तुफान गोलंदाजही काही फलंदाजांना घाबरत होता याची तुम्हाला कल्पना आहे का? खुद्द शोएब अख्तरनेच याचा खुलासा केला आहे. यावेळी शोएबने 2 फलंदाजांची नावं घेतली आहेत.
शोएब अख्तरच्या गोलंदाजीच्या स्पीडला अनेक फलंदाज दचकून असायचे. मात्र असे दोन फलंदाज आहेत ज्यांची शोएब अख्तरला भीती वाटायची. एका क्रिकेटशी संबंधीत वेबसाईटच्या यु-ट्यूब चॅनेलमध्ये मोहम्मद कैफशी बोलताना शोएब म्हणाला, माझ्या मते अॅडम गिलख्रिस्ट हा सर्वोत्तम माणूस आणि सर्वात विचित्र फलंदाज होता. विचित्र म्हणायचं कारण म्हणजे ज्या बॉलवर तो आऊट होऊ शकत होता त्याच बॉलवर सिक्स मारण्याची क्षमता त्याच्याकडे होती.
पर्थमध्ये जेव्हा मी त्याला एक बॉल टाकला तेव्हा तो त्याच्या शरीराला लागला आणि पुढच्याच बॉलवर त्याने सिक्स मारली. जेव्हा मी त्याला पुढे येऊन बीट केलं तेव्हाच त्याने कव्हरमध्ये चौकार मारला. नंतर मला कळलं की, त्याची कमजोरी फक्त यॉर्कर्स आहे. मला त्याची खूप भीती वाटायची, असं शोएबने सांगितलं आहे.
शोएबने दुसरं नाव रिकी पॉटींगचं घेतलं. अख्तर पुढे म्हणाला, मी असा विचार करायचो की, जर तो 15-20 खेळला तर तो 120 बॉल्स नक्कीच खेळेल. याशिवाय सचिनही उत्तम फलंदाजी करायचा. त्याचप्रमाणे राहुल द्रविडची फलंदाजीही चांगली असायची.
शोएब जगातील सर्वोत्तम धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 22 फेब्रुवारी 2003 रोजी शोएब अख्तरने जागतिक क्रिकेटमधील सर्वात जलद बॉल टाकण्याचा विक्रम केला. त्याने 161.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं.