भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यादरम्यानच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. त्याने स्वत: फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब मलिकने इन्स्टाग्रामवर सनासोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. शोएब आणि सनाच्या लग्नादरम्यान सानिया मिर्झासोबतच उमैर जसवाल या आणखी एका नावाची चर्चा सुरु आहे. उमैर जसवाल हा नेमका कोण? त्याचे शोएबच्या लग्नाशी काय कनेक्शन आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 


उमैर जसवाल नेमका कोण?


उमैर जसवाल हा दुसरा तिसरा कोणी नसून सना जावेदचा पहिला पती आहे. सनाने 2020 मध्ये उमैर जसवालसोबत निकाह केला होता. उमैर हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आहे. त्याबरोबरच तो अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत निर्माताही आहे. तो रॉक बँडचा प्रमुख गायक आहे. त्यासोबतच त्याचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. तो बाईकप्रेमीही आहे. सना आणि उमैर यांनी गेल्यावर्षी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता ती दुसऱ्यांदा शोएब मलिकसोबत लग्नबंधनात अडकली. 


शोएब आणि सानिया मिर्झा २०१० साली लग्नबंधनात 


तर दुसरीकडे शोएब आणि सानिया मिर्झा हे २०१० साली लग्नबंधनात अडकले होते. हे शोएबचं दुसरं लग्न होतं. पाकिस्तानच्या खेळाडूशी लग्न करण्यावरून सानिया मिर्झाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर सानिया-शोएब दुबईत राहत होते. सानिया आणि शोएबच्या लग्नानंतर आयेशा सिद्दीकीने माझा आणि शोएबचा साखरपुडा झालेला नाही, असा दावा केला होता. त्यावेळी शोएबने हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर शोएबने रितसर आयेशासोबतच घटस्फोट घेतला.


शोएब हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असून ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १२४ ट्वेन्टी२० सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगभरात विविध ट्वेन्टी२० लीगमध्ये दहाहून अधिक संघांसाठी तो नियमित खेळतो.



दरम्यान सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात बिनसल्याच्या चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने येत आहेत. मात्र यावर कोणीही काहीही भाष्य केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच सानिया मिर्झाने एक पोस्ट लिहित तिच्या आयुष्यावर भाष्य केलं होतं. त्यातच आता शोएब मलिकने सना जावेदसोबत निकाहचे फोटो पोस्ट केल्याने सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.