Ind vs Eng: टीम इंडियाला मोठा धक्का, 2 मोठे खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता
कोण दोन खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाणार आणि नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघानं पहिल्या वन डे सामन्यातही दणदणीत विजय मिळवला आहे. 3 वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा इंग्लंडच्या संघाला मैदानात धूळ चारून भारतीय संघानं 66 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला आणि आपलं वर्चस्व कायम राखलं. याच दरम्यान भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत.
टीम इंडियातील हिटमॅन आणि तरबेज असलेले दोन खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे उर्वरित 2 सामन्यांपर्यंत त्यांची प्रकृती ठिक झाली नाही तर दोन्ही खेळाडू सीरिजमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. असं झालं तर भारतीय संघासाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे.
श्रेयस अय्यर आणि हिटमॅन झाला जखमी
भारत विरुद्ध इंग्लंड नुकताच पहिला वन डे सामना पार पडला आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला. 8 व्या ओव्हरदरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आहे.
शार्दुल ठाकूनं टाकलेल्या चेंडूवर इंग्लंड फलंदाज जॉनी बेयरस्टोने जोरदार फलंदाजी केली. त्यावेळी चेंडू अडवताना श्रेयसच्या खांद्यामध्ये दुखापत झाली. खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयसला मैदानातून बाहेर जावं लागलं. BCCIने यासंदर्भात आपल्या ट्वीटरवर माहिती दिली आहे.
भारतीय फलंदाजीच्या सहाव्या ओव्हरमध्ये हिटमॅन रोहित शर्माला देखील दुखापत झाली. हा भारतीय संघासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
'हिटमन' चेंडूला योग्य पद्धतीनं टोलवू शकला नाही. हा चेंडू वेगानं त्याच्या कोपरापर्यंत गेला. चेंडू लागून रोहितच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. हातातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर तातडीनं उपचार करण्यात आले. रोहित 28 धावा करून तो बाद झाला.
दोन्ही खेळाडू लवकरात लवकर बरे व्हावेत आणि संघात परतावेत यासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना करण्यात आली आहे. 26 आणि 28 मार्च रोजी उर्वरित भारत विरुद्ध इंग्लंड 2 वन डे सामने होणार आहेत. या सामन्यापर्यंत आता दोघंही बरे होणं आवश्यक आहे. दुखापतीमधून दोघंही सावरले नाहीत तर ते उर्वरित सामने खेळू शकणार नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात प्लेइंग इलेवनदरम्यान चित्र अधिक स्पष्ट होईल.