वर्ल्ड कपमधून डच्चू, आता 33 धावांच्या जोरावर IPL 2022 मध्ये होणार कोट्यधीश, कोण आहे तो?
वाचा कोण आहे तो खेळाडू ज्याला अवघ्या 33 धावांच्या जोरावर आयपीएलच्या 15 व्या मोसमातील ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) मोठी रक्कम मिळू शकते.
मुंबई : आपल्या देशाचं प्रतिनिधित्व वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत करावं, असं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मात्र सर्वच खेळाडूंचं ते स्वप्न पूर्ण होत नाही. तर काहींना अनेक वर्ष वाट पाहावी लागते. अशाच एका खेळाडूची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली नाही. तोच खेळाडू आता चर्चेचा विषय ठरलाय. आपण बोलतोय ते शाहरुख खान बद्दल. शाहरुखने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अंतिम चेंडूवर सिक्स खेचत तामिळनाडूला चॅम्पियन बनवलं. (smat final 2021 Tamil Nadu winning hero shahrukh khan scored 33 runs against karnataka has likely be get big amount in ipl 2022 auction)
शाहरुखने निर्णायक क्षणी 15 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. या वादळी खेळीत त्याने 3 सिक्स आणि 1 चौकार लगावला. त्याच्या या जिगरबाज खेळीचं कौतुक केलं जातंय. या खेळीमुळेच तो चर्चेचा विषय ठरलाय. मात्र शाहरुखने इथवर पोहचण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. तसेच त्याच्या या यशामागे खूप मोठा संघर्ष आहे.
हा स्टार खेळाडू आयपीएलच्या 14 व्या मोसमातील ऑक्शन दरम्यान चर्चेत आला. शाहरुखची बेस प्राईज 20 लाख होती. मात्र पंजाब किंग्सने 5 कोटी 25 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.
वडील-भाऊ क्रिकेटर
शाहरुखचे वडील आणि भाऊ हे दोघेही क्रिकेटपटू होते. शाहरुखचे वडिलांनी लीग सामन्यांमध्ये चेन्नईचं प्रतिनिधित्व केलंय. तर त्याचा भाऊही याच स्तरावर खेळलाय. मात्र शाहरुख या दोघांच्या पुढे निघाला. शाहरुख लिस्ट ए, रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये खेळला आहे.
वर्ल्ड कपमध्ये संधी नाही
शाहरुखने 2014 मध्ये कूच बिहार स्पर्धेतील अवघ्या 8 डावांमध्ये 624 धावा चोपल्या होत्या. त्याच्या या शानदार कामगिरीनंतरही त्याचा अंडर 19 वर्ल्ड कपसाठी विचार करण्यात आला नाही. त्याला टीम इंडियाकडून 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आलं नाही. यामुळे शाहरुख खचला होता. तो काहीसा निराश झाला होता. त्याला याची आजही खंत आहे.
शाहरुखने 2018 मध्ये तामिळनाडूकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या वेळेस शाहरुख अवघ्या 18 वर्षांचा होता. शाहरुखने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून पदार्पण केलं. या पदार्पणातील सामन्यात त्याने 8 चेंडूत 21 धावा ठोकत छाप सोडली. मात्र त्यानंतर पुढील 4 सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला.
4 वर्षांचा वेटिंग पिरीयड
शाहरुखची 2014 मध्ये रणजी क्रिकेटसाठी तामिळनाडूकडून निवड करण्यात आली. मात्र त्याला 4 वर्ष वाट पाहावी लागली. शाहरुखला जेव्हा खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने आपली चुणूक दाखवून दिली. शाहरुखने डेब्यूत 92 धावांची निर्णायक खेळी केली. या सामन्यात तामिळनाडू अडचणीत असताना त्याने निर्णायक वेळी 92 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने तामिळनाडूने हा सामना 151 धावांनी जिंकला.
मुंबईने नाकारलं
शाहरुख आयपीएल 2020 च्या ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सच्या ट्रायलला गेला होता. मात्र त्याला निवडकर्त्यांना प्रभावित करता आलं नाही. इतकंच नाही तर, ट्रायल दरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. आयपीएलच्या 13 व्या मोसमात शाहरुख अनसोल्ड राहिला. त्याला कोणत्याच फ्रँचायजीने खरेदी केलं नाही.
मात्र 14 व्या मोसमात पंजाब किंग्सने शाहरुखसाठी 5 कोटी 25 लाख मोजले. कर्नाटक विरुद्ध केलेल्या अंतिम सामन्यात 33 धावांमुळे आता आयपीएलच्या 15 व्या मोसमात शाहरुखला खरेदी करण्यासाठी फ्रँचायजींमध्ये चढाओढ पाहायला मिळेल.
आयपीएलच्या 15 व्या मोसमात 2 नवे संघ सहभागी होणार आहेत. तसेच मेगा ऑक्शनही होणार आहे. त्यामुळे या वेळेस शाहरुखला आणखी भाव मिळू शकतो. त्यामुळे या ऑक्शनमध्ये काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.