IND vs ENG: ...म्हणून इंग्लंडचा डाव 0/0 नव्हे तर 5/0 पासून होणार सुरू; अश्विनची `ती` चूक भोवली
IND vs ENG: अश्विनच्या या चुकीमुळे भारताच्या डावातच इंग्लंडचं खातं उघडलं आहे. जेव्हा इंग्लंडची टीम फलंदाजीला येईल तेव्हा त्यांची धावसंख्या 0/0 पासून नाही तर 5/0 पासून सुरू होणार आहे.
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येतोय. दरम्यान या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक अशी घटना घडली ज्याचा परिणाम संपूर्ण टीम इंडियाला महागात पडला आहे. टीम इंडियाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनकडून एक मोठी चूक झालेली दिसून आली. यामुळे भारताला पेनल्टी लागली.
अश्विनची ही चूक टीम इंडियाला पडणार महागात
अश्विनच्या या चुकीमुळे भारताच्या डावातच इंग्लंडचं खातं उघडलं आहे. जेव्हा इंग्लंडची टीम फलंदाजीला येईल तेव्हा त्यांची धावसंख्या 0/0 पासून नाही तर 5/0 पासून सुरू होणार आहे.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाचे फलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर ध्रुव जुरेल आणि रविचंद्रन अश्विनने डावाची धुरा सांभाळली. दरम्यान यावेळी 102 व्या ओव्हरमध्ये अश्विनने मोठी चूक केली. अंपायर जोएल विल्सन यांनी त्याला पीचच्या मध्यभागी धावण्यासंदर्भात इशारा दिला. अश्विनने अंपायरशीही चर्चा केली, पण भारताला दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे आता इंग्लंडचा पहिला डाव थेट 5/0 वर सुरू होईल.
पहिल्याच दिवशी मिळाला होता इशारा
गुरुवारी टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला याबाबत इशारा देण्यात आला होता. त्यामुळे भारतावर हा दंड ठोठावण्यात आला. रविचंद्रन अश्विनच्या आधी रवींद्र जडेजा मधल्या पीचवर धावला. नियमांनुसार, प्रथमच असं घडल्यास इशारा देण्यात येतो. मात्र जर असा प्रकार दुसऱ्यांदा घडल्यास दंड आकारला जातो. खेळपट्टीचे नुकसान होऊ नये यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
क्रिकेटचा नियम यासंदर्भात काय सांगतो?
MCC कायदा 41.14.1 नुसार, पीचच्या मध्यभागी धावणं हे अनफेयर प्ले सेक्शन अंतर्गत येतं. त्यामुळे नियमांनुसार, “खेळपट्टीला जाणीवपूर्वक नुकसान करणं अयोग्य आहे. बॉल खेळल्यानंतर फलंदाज डेंजर झोनमध्येआला तर त्याने लगेच तिथून दूर जावं. कोणत्याही वैध कारणाशिवाय फलंदाज खेळपट्टीवर असल्याचे अंपायरला वाटत असेल, तर तो खेळपट्टी खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जाईल.
नियम पुढे असं सांगतो की, असे केल्याने टीमला पहिला आणि शेवटचा इशारा मिळणार आहे. जो संपूर्ण डावात लागू असणार आहे. डावादरम्यान टीमतील कोणत्याही सदस्याने ही चूक पुन्हा केल्यास फलंदाजी करणाऱ्या टीमवर पाच रन्सचा दंड आकारला येईल.