यूएई : टीम इंडियाचे टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2021) काही निर्णय चुकले असल्याचं हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) मान्य केलं आहे. मात्र घरापासून दूर असल्याने मानसिकरित्या आम्ही थकलेलो होतो, असंही रोहितने नमूद केलं. अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाने 66 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात सलामीला आलेल्या रोहितने 74 धावांची महत्तवपूर्ण खेळी केली. रोहितच्या या प्रतिक्रियेमागील रोख हा पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवाकडे होता. (Some decisions of Team India proved wrong in T20 World Cup says rohit sharma)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित काय म्हणाला?


"अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात आमचा दृष्टीकोन वेगळा होता. अफगाणिस्तान विरुद्ध जसं खेळलो तसं कदाचित पहिल्या 2 सामन्यात खेळलो असतो तर बरं झालं असतं. मात्र असं झालं नाही. मोठ्या काळापासून घरापासून दूर राहिल्याने असं होतं. अनेकदा अनेक निर्णय चुकतात आणि हेच पहिल्या 2 सामन्यात झालं", असं रोहितने स्पष्ट केलं. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळस त्याने विविध प्रश्नांची उत्तर दिलं.


"आजकाल मोठ्या प्रमाणात क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जातंय आणि त्या सर्व सामन्यांमध्ये आम्ही सहभागी होतोय. अशात जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा अचूक निर्णय घ्यायचे असतात. तुम्ही मानसिकरित्या सुदृढ आहात हे निश्चित करायचं असतं. या मानसिक कारणांमुळे आम्ही योग्य निर्णय घेऊ शकलो नाहीत. खूप क्रिकेट खेळल्यावर असं होतं. अनेकदा खेळापेक्षा तुम्ही मानसिकरित्या मजबूत असावं लागतं", असं रोहितने स्पष्ट केलं.


"तुम्ही जेव्हा वर्ल्ड कपमध्ये खेळताय तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष  हे स्पर्धेवर असायला हवं. नेमकं काय करायचं आणि काय टाळायचंय हे तुम्हाला माहिती असायला हवं. दोन सामन्यात पराभूत झाल्याने टीम खराब ठरत नाही. दोन सामन्यात आम्ही चांगलं खेळलो नाहीत, यामुळे काही दिवसांत वाईट खेळाडू झालो असं होत नाही. तुम्ही आत्मचिंतन करता. आम्हीही तेच केलं आणि पुनरागमन केलं", असं रोहितने सांगितलं.


"अशा परिस्थितीत तुम्हाला निर्भिड रहावं लागतं. तसंच खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. आमचा संघ सर्वोत्तम आहे. फक्त 2 सामन्यात आम्ही चांगलं खेळू शकलो नाही", अशीही खंत रोहितने व्यक्त केली.