आयपीएल वेगळ्या स्वरुपात! निवडणुकींमुळे हे बदल होणार
आयपीएलचा १२वा मोसम भारतातच खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयनं मंगळवारी याची घोषणा केली आहे.
मुंबई : आयपीएलचा १२वा मोसम भारतातच खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयनं मंगळवारी याची घोषणा केली आहे. २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होईल, असं बीसीसीआयनं सांगितलं आहे. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकींमुळे सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल भारताबाहेर खेळवलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण बीसीसीआयनं या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या राज्य सरकार यांच्यासोबतच्या चर्चेनंतर आयपीएल भारतातच घेण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असं बीसीसीआयनं प्रसिद्धी पत्रकात म्हणलं आहे.
२०१९ साली होणारी आयपीएल भारतातच होणार असली तरी या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल होऊ शकतात. नेहमी आयपीएलची स्पर्धा होम-अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जाते. म्हणजेच प्रत्येक टीम एक मॅच स्वत:च्या घरच्या मैदानात आणि दुसरी मॅच प्रतिस्पर्धी टीमच्या घरच्या मैदानात खेळते. पण यावर्षी मात्र या फॉरमॅटमध्ये बदल होऊन मॅच न्यूट्रल(तटस्थ) ठिकाणी खेळवल्या जाऊ शकतात.
लोकसभा निवडणूक होत असल्यामुळे जुन्या फॉरमॅटनुसार मॅच खेळवल्या तर सरकारला मुबलक सुरक्षा देणं अशक्य होईल, त्यामुळे काही मॅच या न्यूट्रल ठिकाणी खेळवल्या जातील. बीसीसीआयनं सगळ्या टीमना त्यांच्या घरच्या मैदानात ३ मॅच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. उरलेल्या मॅच या न्यूट्रल ठिकाणी खेळवल्या जातील, असं बोललं जातंय.
डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल मॅच न्यूट्रल ठिकाणी खेळवण्याबद्दल चर्चा झाली आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे. जर सरकारनं सुरक्षा देण्यासाठी असमर्थता दर्शवली तर याबद्दल विचार करण्यात येईल, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. आयपीएलचं भारतातच आयोजन व्हावं, हे आमचं पहिलं उद्दीष्ट आहे. भारतात आयपीएलचं आयोजन होत असल्यामुळे दोन्ही टीमना मान्य असलेल्या ठिकाणी मॅच होणार असतील तर त्यात कोणतीच अडचण नाही, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
न्यूट्रल ठिकाणी मॅच खेळवण्यात येणार असल्यामुळे आता बीसीसीआय लवकरच ५ ते ६ स्टेडियमची घोषणा लवकरच करू शकते. सध्या बीसीसीआयनं आयपीएल २३ मार्चपासून सुरु होईल, एवढच सांगितलं आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आयपीएलचं वेळापत्रक घोषित करण्यात येईल, असं सांगण्यात येतंय. आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या तारखा २ फेब्रुवारीला घोषित होऊ शकतात.
याआधी २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली होती. २००९ साली संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत तर २०१४ साली आयपीएलचा पहिला भाग युएईमध्ये आणि दुसरा भाग भारतात खेळवण्यात आला होता.