सोनू जलाननं आयपीएल २०१८ मध्ये कमावले ५०० कोटी रुपये
आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याचं अभिनेता अरबाज खाननं कबूल केलं आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याचं अभिनेता अरबाज खाननं कबूल केलं आहे. ठाणे पोलिसांनी अरबाज खानची चौकशी केली तेव्हा आपल्याला सट्टेबाजीमध्ये तीन कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. तसंच मागच्या वर्षी २.७५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं अरबाजनं सांगितलं. मागच्या ६ वर्षांपासून मी सट्टा लावत असल्याची कबुली अरबाज खाननं दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०१८च्या संपूर्ण मोसमात बुकी सोनू जलाननं ५०० कोटी रुपयांची कमाई केली. फायनल मॅचमध्ये त्यानं १० कोटी रुपये कमावले.
अरबाज खाननं या प्रकरणामध्ये मुख्य साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असं झालं तर अरबाजला अटक करण्यात येणार नाही. पण याप्रकरणातला मुख्य आरोपी सोनू जलानविरुद्ध ठाणे पोलीस मकोका लाऊ शकते.
'म्हणून पैसे दिले नाहीत'
प्रत्येक डिलनंतर सोनूला पैसे का दिले नाहीत असा सवाल पोलिसांनी अरबाजला विचारला. सोनू आमच्या फिल्मी पार्टीला यायचा. चित्रपटाच्या यशाबद्दल त्याला माहिती होतं. आमची चांगली ओळखही होती. त्यामुळे त्याला पैसे डुबण्याची भीती नव्हती, असं उत्तर अरबाजनं पोलिसांना दिलं.
सोनू जलानचं ऑटो पार्ट्सचं दुकानही आहे. सट्टेबाजातून कमावलेल्या काळ्या पैशाचा सोनू या व्यवसायात वापर करत होता. सट्टेबाजीमध्ये मोठी रक्कम जिंकल्यावर सोनूनं एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अरबाजसोबत इतर बॉलीवूड सेलिब्रिटीही आल्या होत्या.