दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी दादाचा विराटला सल्ला
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा रोमांचक मॅचमध्ये पराभव झाला.
बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा रोमांचक मॅचमध्ये पराभव झाला. पण या मॅचमधल्या भारताच्या बॅटिंगवर जोरदार टीका होत आहे. विराट कोहली वगळता भारताचे इतर बॅट्समन अपयशी ठरले. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रन केले तर दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रन केले. इंग्लंडनं ठेवलेल्या १९४ रनचा पाठलाग करताना भारतीय टीम १६२ रनवर ऑल आऊट झाली आणि ३१ रननी पराभव झाला. यानंतर भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीनं विराट कोहलीला सल्ला दिला आहे.
भारतीय टीममध्ये वारंवार बदल केले जात आहेत. पण कर्णधारानं खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांना ठराविक संधी दिली पाहिजे, असं सौरव गांगुली म्हणाला आहे. स्विंग बॉलिंगपुढे अपयशी झालो असं कारण देता येणार नाही कारण इंग्लंडमध्ये स्विंग बॉलिंगपुढेच खेळावं लागतं आणि यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.
पुजारा, राहुल आणि रहाणेबद्दलच्या भूमिकेवरही गांगुलीनं प्रश्न उपस्थि केले. या तीन खेळाडूंची जागा वारंवार बदलण्यात आली नाहीतर त्यांना टीममधून डच्चू देण्यात आला. पण या खेळाडूंसोबत बसून विराटनं त्यांना विश्वास दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली. एकसारखं टीममधून काढल्यामुळे किंवा त्यांच्या बॅटिंगच्या क्रमांकामध्ये बदल केल्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होतो, असं गांगुलीला वाटतंय. एवढ्या वर्षानंतरही आपल्यावर टीमचा विश्वास नसल्याची भावना या खेळाडूंची होते, असं वक्तव्य गांगुीलनं केलं आहे.
मुरली विजय आणि अजिंक्य रहाणेला चिकाटीनं बॅटिंग करावी लागेल. विजयनं पहिल्या टेस्टमध्ये २० आणि ६ तर अजिंक्यनं १५ आणि २ रन बनवले होते. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयनं मागच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये रन केले होते. या दौऱ्यातही त्यांना जबाबदारी दाखवावी लागेल कारण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी रन केल्या आहेत, असं गांगुली म्हणाला. इन्स्टाग्रामवर गांगुलीनं याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे.