कोलकाता : प्रशासकीय पदावर नसतो तर मी पण भारताचा प्रशिक्षक होऊ शकलो असतो अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं दिली आहे. सौरव गांगुली हा सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचबरोबर लोढा समितीच्या काही शिफारशींवर राज्य संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी बीसीसीआयनं सात सदस्यीय समितीची स्थापन केली आहे.


या समितीचं अध्यक्षपद हे राजीव शुक्लांकडे सोपवण्यात आलंय. त्याचप्रमाणे भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, केरळ क्रिकेटचे टीसी मॅथ्यू, पूर्व विभागाचे ए. भट्टाचार्य, गुजरात क्रिकेट असोसिएशनचे जय शाह, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि बीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी या समितीचे सदस्य आहेत.


भारताचा प्रशिक्षक निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या समितीचा सदस्यही गांगुली आहे. गांगुलीबरोबर सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मणही या समितीमध्ये आहेत. 


भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक होण्यासाठी आता रवी शास्त्रीनंही अर्ज केला आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदाची चुरस आणखी वाढली आहे. याआधी सेहवाग, लालचंद राजपूत, डोडा गणेश, टॉम मूडी, रिचर्ड पायबस यांनी अर्ज केले आहेत.


अर्ज आलेल्या या खेळाडूंपैकी एकाची नियुक्ती सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांची समिती करणार आहे. मागच्यावेळी रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशिक्षक म्हणून नियुक्ती न झाल्यामुळे रवी शास्त्री नाराज झाला होता. आपल्या प्रशिक्षक न होण्याला सौरव गांगुलीच जबाबदार असल्याचे आरोप रवी शास्त्रीनं केले होते.