भाजप प्रवेशाच्या चर्चांवर गांगुलीने मौन सोडलं
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
कोलकाता : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर बीसीसीआयच्या इतर दोन महत्त्वाच्या पदी भाजप नेत्यांच्या नातेवाईकांची वर्णी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयचे सचिव बनणार आहेत, तर भाजपचे दुसरे नेते आणि वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमल कोषाध्यक्ष होतील.
सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्याच्या भाजप प्रवेशाचीही चर्चा सुरु झाली. अमित शाह यांनीही गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला, तर त्याचं स्वागत करु, असं म्हणलं होतं. यानंतर आता सौरव गांगुलीनेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'अमित शाह यांना मी पहिल्यांदा भेटलो. मी त्यांना बीसीसीआयबद्दल प्रश्न विचारला नाही, तसंच मला बीसीसीआयमध्ये कोणतं पद मिळेल?, काही गोष्टींबद्दल सहमत झालात तरच हे पद मिळेल, अशाप्रकारचा संवाद झाला नाही. आमच्या भेटीत कोणत्याच राजकीय चर्चा झाल्या नाहीत,' असं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष होण्यासाठी कोणतंही डील केलं नसल्याचं गांगुलीने सांगितलं.