`दादाशी पंगा तर...` सौरव गांगुली यांनी युवा क्रिकेटरला असा शिकवला धडा
9व्या ओव्हर दरम्यान स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजीसाठी आला त्यावेळी सौरव गांगुली यांनी गोलंदाजाला काहीतरी सुनावलं, व्हिडीओ
मुंबई: आयपीएल असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने स्लेजिंग सगळीकडेच होते. बऱ्याचदा त्यातून होणाऱ्या वादाचे किस्से देखील समोर आले आहेत. अनुभवाने मोठ्या असणाऱ्या क्रिकेटपटूंशी स्लेजिंग करण्याचा पंगा विशेष घेतला जात नाही मात्र असाच एक किस्सा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत घडला होता. सौरव गांगुली यांनी स्लेजिंग करणाऱ्या युवा क्रिकेटपटूला आयुष्यभर लक्षात राहिल अशी अद्दल घडवली होती.
साधारण हा किस्सा आहे 2007मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत 7 वन डे सीरिज सामन्या दरम्यानचा. इंग्लंडचा युवा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने चक्क सौरव गांगुली यांच्यासोबत पंगा घेतला होता. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर तेव्हा क्रीझवर खेळत होते. दोघांनीही चांगली सुरुवात करत 50हून अधिक धावांची भागीदारी केली होती.
'दादा'सोबतचं पहिलं स्लेजिंग... उपाशीपोटी ठोकलेलं शतक, सौरव गांगुलीनं सांगितला किस्सा
9व्या ओव्हर दरम्यान स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजीसाठी आला त्यावेळी सौरव गांगुली यांनी गोलंदाजाला काहीतरी सुनावलं. त्यानंतर मैदानात गांगुली यांना शांत करण्यात आलं आणि खेळ पुढे सुरू झाला. कॉमेन्ट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या कमेंटेटर्सच्या म्हणण्यानुसार गांगुली यांनी गोलंदाजाला फटकारलं होतं. 'जेवढं तुझं वय नाही तेवढा माझा अनुभव आहे. त्यामुळे तू माझ्यासोबत स्लेजिंग केलंस ते योग्य नाही.'
हा वाद मैदानात तिथल्या तिथे शांत करण्यात आला असला तरी सौरव गांगुली यांच्या डोक्यात मात्र सुरू होता. त्यांनी या गोलंदाजाला कायमची अद्दल घडवायचं ठरवलं. 11 ओव्हरमध्ये या गोलंदाजाच्या बॉलवर त्यांनी सर्वात लांब षटकार ठोकला. या सामन्यात दादाने अर्धशतक देखील ठोकलं होतं.