व्हीव्हीएस लक्ष्मणमुळे वाचली सौरव गांगुलीची कारकिर्द
जेव्हा लक्ष्मणनं वाचवली सौरव गांगुलीची कारकिर्द
कोलकाता : व्हीव्हीएस लक्ष्मणमुळे माझी कारकिर्द वाचली असल्याचा दावा भारतीय टीमचा कर्णधार सौरव गांगुलीनं केला आहे. बुधवारी कोलकात्यामध्ये लक्ष्मणचं आत्मचरित्र '२८१ अॅण्ड बियॉण्ड' या पुस्तकाचं लॉन्चिंग करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान गांगुलीनं लक्ष्मणनं खेळलेल्या २८१ रनच्या खेळीचं महत्त्व सांगितलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणनं खेळलेल्या २८१ रनमुळे माझी कारकिर्द वाचली, असं गांगुली या कार्यक्रमात म्हणाला.
२००१ सालच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियानं मुंबईतली पहिली टेस्ट जिंकली होती. त्यामुळे भारत सीरिजमध्ये ०-१नं पिछाडीवर होता. दुसऱ्या कोलकाता टेस्टमध्येही भारताला फॉलोऑन मिळाला होता. यानंतर बॅटिंगला आलेल्या लक्ष्मणनं २८१ रन आणि राहुल द्रविडनं १८० रनची खेळी केली होती. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ३७६ रनची पार्टनरशीप झाली होती. फॉलोऑन मिळाल्यानंतरही भारताचा १७१ रननी विजय झाला होता. याचबरोबर भारतानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वॉचं लागोपाठ १६ टेस्ट मॅच जिंकण्याचं रेकॉर्डही मोडलं होतं. शेवटच्या दिवसाच्या चहापानानंतर आपण ही मॅच जिंकू शकतो, असं मला वाटलं होतं, असं लक्ष्मण म्हणाला.
ईडन गार्डनमधला तो विजय फक्त भारतासाठीच महत्त्वाचा नव्हता तर माझी कर्णधारपदाची कारकिर्द वाचवण्यातही त्या इनिंगनं महत्त्वाची भूमिका बजावली, असं वक्तव्य गांगुलीनं केलं. मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर सौरव गांगुलीनं भारतीय टीमचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. मॅच फिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेट त्याकाळी कठीण काळातून जात होतं.
'पुस्तकाचं नाव हे असावं'
लक्ष्मणच्या या पुस्तकाचं नाव '२८१ अॅण्ड बियॉण्ड' नाही तर '२८१ अॅण्ड बियॉण्ड डेट सेव्हड सौरव गांगुली करियर' असं असायला पाहिजे होतं. मागच्याच आठवड्यात या नावाबद्दल मी लक्ष्मणला मेसेज करुन सांगितलं, पण त्यानं रिप्लाय दिला नाही, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली.
'तेव्हा निवृत्तीचा विचार'
२००३ साली वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता, असं लक्ष्मणनं सांगितलं. वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड न होणं हा माझ्यासाठी कारकिर्दीतला सगळ्यात वाईट काळ होता. तेव्हा मी भारतीय ए टीमसोबत होता. त्या टीमसोबत जायची माझी इच्छा नव्हती पण माझ्या वडिलांनी मला जायला सांगितल्याचं लक्ष्मण म्हणाला.
काही वेळ घालवण्यासाठी मी अमेरिकेमध्ये गेलो तेव्हा मी पुन्हा खेळू शकतो असा विश्वास मला वाटायला लागल्याचं वक्तव्य लक्ष्मणनं केलं. टेस्टमध्ये यशस्वी होऊनही लक्ष्मणची वनडे कारकिर्द बहरली नाही. लक्ष्मणला भारताकडून फक्त ८६ वनडेच खेळता आल्या. ही एक चूक होती, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली.