दक्षिण आफ्रिकेनं इतिहास घडवला, ४८ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली सीरिज
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ४९२ रन्सनी जिंकली आहे.
जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ४९२ रन्सनी जिंकली आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेनं इतिहास घडवला आहे. रन्सच्या हिशोबानं दक्षिण आफ्रिकेचा हा सगळ्यात मोठा विजय तर ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात मोठा पराभव आहे. ४८ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज जिंकली आहे. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ३-१नं विजय मिळवला आहे.
फिलँडरनं कांगारुंना गुंडाळलं
वर्नन फिलँडरनं २१ रन्स देऊन ऑस्ट्रेलियाच्या ६ बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या मॅचमध्ये फिलँडरनं टेस्ट क्रिकेटमध्ये २०० विकेटचा टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मॉर्ने मॉर्कलची ही शेवटची टेस्ट होती. त्यानं शेवटच्या इनिंगमध्ये २ विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी
दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोनच बॅट्समनना दोन आकडी स्कोअर करता आला. जो बर्न्सनं ४२ तर पीटर हॅण्ड्सकॉम्बनं २४ रन्स केले. पाचव्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियानं ८८/३ अशी केली होती पण त्यांना फक्त १६.४ ओव्हरच खेळता आल्या. ६१२ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम ११९ रन्सवर ऑल आऊट झाली.
दक्षिण आफ्रिकेची शानदार बॅटिंग
या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेची शानदार बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये ओपनर एडन मार्करमनं १५२ रन्सची खेळी केली. तर दुसऱ्या इनिंगमध्ये कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं १२० रन्स केले.
वादात अडकली संपूर्ण सीरिज
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधली ही सीरिज पहिल्यापासूनच वादात अडकली. पहिल्या टेस्टमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डीकॉक एकमेकांना भिडले. पॅव्हेलियनमध्ये जात असतानाची ही दृष्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. तर तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आणि कॅमरून बँक्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली.