राजीव कासले, झी २४ तास, मुंबई : भारतीय खेळाची शोकांतिका, भारतात क्रिकेट (Cricket) खेळाव्यतिरिक्त इतर खेळांना क्वचितच प्रसिद्धी दिली जाते. 14 ऑगस्ट 2016 चा तो दिवस भारतीय क्रीडा प्रेमी आजही विसरलेले नाहीत. त्यादिवशी सव्वाशे कोटी भारतीयांची छाती अभिमानाने फुगली होती. 52 वर्षांमध्ये जे भारतीय जिम्नॅस्टला (Gymnastics) जमले नव्हते ते एका 22 वर्षीय मुलीने करून दाखवलं होतं. जिम्नॅस्टिक विश्वात अत्यंत कठिण मानल्या जाणाऱ्या प्रोदुनोव्हा व्हॉल्टचं (Produnova Vault) तिनं अद्भूत प्रदर्शन केलं होतं. ती मोठ्या थाटात अंतिम फेरीत पोहोचली होती. तिचं अंतिम फेरीत पोहोचणंच आम्हां भारतीयांसाठी ऑलिम्पिक (Olympic) पदकापेक्षा कमी नव्हतं. तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला  (Rio Olympic) अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं. तिचा भन्नाट खेळ पाहता तिचं पदक हमखास मानलं जात होतं, पण सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. तिचं पदक थोडक्यात हुकलं. तेव्हा सर्वांच्या मुखी एकच वाक्य होतं, "खूब लढी मर्दानी..."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ती मर्दानी झुंझार खेळली आणि तिने चौथे स्थान मिळवले. ती कांस्य जिंकली नसली तरी तिने कोट्यवधी भारतीयांची मनंसुद्धा जिंकली. तिच्या कामगिरीवर सारेच फिदा होते. तमाम भारतीयांना तिचा अभिमान वाटत होता. एका क्षणात ती कोट्यवधी भारतीयांची आयडल बनली. 


तिला जे जिंकल्यावर मिळणार होतं ते सारं हरल्यानंतरही मिळालं. रिओवरून आल्यावर ती सेलिब्रेटी झाली होती. तिला पाहताच कॅमेऱ्यांचा नुसता कलकलाट सुरू असायचा. अशी आमची नवी स्पोर्ट्स सेनसेशन म्हणजे त्रिपूराची दिपा करमाकर (Dipa Karmakar).


मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान ती आली तेव्हाही तिच्या अवतीभवती चाहत्यांचा गराडा होता. पण दिपा एका सामान्य मुलीसारखीच वागत होती. कुठेही तिच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा शिरली नव्हती. तिचे पाय जमीनीला घट्ट पकडून होते. त्यानंतर तब्बल तीनेक वर्षांनंतर ती पुन्हा दिसली. पण तिला पाहून आधी विश्वासच बसत नव्हता की, ती दिपाच आहे. 


भारताची ही स्टार खेळाडू, खेलरत्न आणि पद्मश्री दिपा करमाकर प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या फितवाला रोडवरून आपले प्रशिक्षक नंदी यांच्याबरोबर जात होती. सर्वप्रथम मी तिला पाहिलं आणि माझा मित्र मंगेश वरवडेकरला सांगितलं. सुरुवातीला त्याचाही विश्वास बसला नाही.


मुळात  दीपा करमाकर या वर्दळीच्या रस्त्यावरून का जाईल ? त्यामुळे आम्ही  आधी धावत तिच्या पुढे गेलो आणि मागे वळून पाहिलं तर ती दिपाच निघाली. आमच्यासाठी तो आनंदाचा धक्का होता. म्हणून आम्ही  तिलाच विचारलं. दिपा ? तर ती म्हणाली, हो मी दिपाच. 


आमचा प्रश्न अत्यंत ऑड होता. पण तिने हसत खेळत उत्तर दिलं. तिला सर्वसामान्य मुंबईकरासारखं रस्त्यावरून चालणं आम्हाला  अपेक्षित नव्हतं, म्हणून तिला पुढे विचारलं, तू रस्त्यावरुन चालतेस अन तुला कुणीही ओळखलं नाही? तिचा चेहरा काहीसा पडला. ती म्हणाली, तूम्हीच मला सर्वप्रथम ओळखलंसत. 


ती आपल्या टाचेवर उपचार करण्यासाठी डॉ. अनंत जोशींच्या "स्पोर्ट्समेड" या मेडिकल सेंटरमध्ये आली होती.   ती स्पोर्ट्समेड येथून प्रभादेवी स्थानकापर्यंत तब्बल 400 मीटर चालली. पण या 400 मीटरच्या अंतरात तिला ओळखणारा, तिच्याबरोबर सेल्फी काढणारा किंवा तिची ऑटोग्राफ घेणारा एकही चाहता तिला भेटला नाही. 


हे जर लंडन, अमेरिका किंवा युरोप मध्ये घडलं असतं तर एकवेळ समजू शकलो असतो. तिथे खेळाडूंना रस्त्यावरून फिरताना कुणी अडवत नाही. खेळाडू असोत किंवा फिल्मस्टार, ते फिरत असताना कुणी त्रास देत नाहीत. फोटोसाठी मागे लागत नाहीत. पण हे भारत आहे. हे कसं विसरता येईल.


एव्हाना एखादा क्रिकेटपटू मुंबईच्या रस्त्यावरून फिरकला असता तर त्याच्या अवतीभवती चाहत्यांची तुफान गर्दी झाली असती. ट्रॅफिक जाम झालं असतं. त्या खेळाडूला पळावं लागलं असतं. पण असं क्रिकेटेतर खेळाडूंच्या बाबतीत क्वचितच घडतं. त्याला अनेक कारणं असतील आणि आहेत. 


मुळात क्रिकेट म्हणजे आपल्याकडे धर्म मानला जातो तर खेळाडूंना देव. हे अन्य खेळांच्या बाबतीत लागू पडत नाहीत. आपल्या इथे क्रिकेटची लोकप्रियता अफाट आहे. त्याना मिळणारी प्रसिद्धीही कल्पनेच्या पलीकडे आहे. क्रिकेटची खूप सारी अत्याधुनिक स्टेडियम्स आहेत. त्यातच जास्तीत जास्त वेळ क्रिकेटचे सामने टीव्हीवर लाईव्ह दिसतात. त्यामुळे क्रिकेट आणि क्रिकेटपटू घराघरांत पोचलेत. या तुलनेत आपले इतर खेळ कुठे आहेत? आता जिम्नॅस्टिकच घ्या. 


या खेळाला आहेत का आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम्स? या खेळांचे कितीवेळ थेट प्रक्षेपण केले जाते? हेच दुर्दैव दोनचार खेळ वगळता सर्वांच्या पदरी पडलंय. तसेच या खेळाचा पीआर कुठे आहे. जर दिपाच्या जागी एखादा क्रिकेटपटू असता तर त्याने त्याच्या दुखापतीची बातमी केली गेली असती. 


दुखापत बरी व्हायला अजून किती दिवस लागणार याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली असती. पण इथे दीपा आली आणि गेली. करायला गेलो असतो तर खूप काही करता आलं असतं. असो, असे असले तरी प्रभादेवी अर्थातच एल्फिन्स्टनच्या गर्दीत दीपाला एकानेही ओळखू नये याला नेमकं काय म्हणावं??? सुचत नाहीय ! हा प्रश्न माझ्या मनाला टोचत राहणार.