लंडन : पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात फसला आहे.  ३७ वर्षांचा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर दानिश कनेरियानं स्पॉट फिक्सिंगचे आरोप कबूल केले आहेत. मागच्या ६ वर्षांपासून कनेरियानं हे आरोप फेटाळून लावले होते. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं जन्मभर बंदी घातलेल्या दानिश कनेरियानं अल जजीरा टीव्हीच्या डॉक्युमेंट्रीसाठी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं फिक्सिंग केल्याचं कबूल केलं. माझं नाव दानिश कनेरिया आहे आणि मी इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डानं २०१२ साली लावलेले आरोप स्वीकारतो, असं दानिश कनेरिया म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी एसेक्स काऊंटीमधला माझा खेळाडू मर्व्हिन वेस्टफील्ड, एसेक्स क्रिकेट क्लब आणि एसेक्सच्या फॅनची माफी मागतो. मी पाकिस्तानचीही माफी मागतो, अशी प्रतिक्रिया दानिश कनेरियानं दिली आहे.


पुराव्यांअभावी सुटला दानिश कनेरिया


मी माझं मन कठोर करून सत्य सांगायचा निर्णय घेतला. कारण खोट्याच्यासोबत तुम्ही आयुष्यभर जगू शकत नाही, असं वक्तव्य दानिश कनेरियानं केलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दानिश कनेरियाला २०१०ला वेस्टफील्डसोबत अटक करण्यात आली होती. पण पुराव्यांअभावी दोघांना सोडून देण्यात आलं होतं. त्यावेळी दानिशनं हे आरोप फेटाळून लावले असले तरी त्याला इंग्लंड बोर्डानं काऊंटी खेळण्यावर आयुष्यभराची बंदी घातली होती.


एका रनसाठी मिळाले ४८ हजार रुपये


वेस्टफील्डनं २००९ साली डरहममध्ये ४० ओव्हरच्या एका काऊंटी मॅचमध्ये पहिल्या ओव्हरला १२ रन देण्यासाठी कथित सट्टेबाज अनु भटकडून ७,८६२ डॉलर घेतले होते. याचं आजचं मूल्य जवळपास ५.८ लाख भारतीय रुपये आहे. कनेरियाच्या मध्यस्तीनंतर हे डील झालं होतं. कनेरियानंच वेस्टफील्डला भटसोबत भेट घालून दिली होती.


दानिश पहिलाच पाकिस्तानी नाही


स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अडकलेला दानिश कनेरिया पहिलाच पाकिस्तानी खेळाडू नाही. याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटनंही स्पॉट फिक्सिंग केल्याचं कबूल केलं होतं. सलमान बटनं पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध २०१० साली झालेल्या सीरिजदरम्यान स्पॉट फिक्सिंग केलं होतं. यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली.


पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसीफ यांनी २०१० सालच्या इंग्लंड दौऱ्यातल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये जाणूनबुजून नोबॉल टाकले होते. याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर दोघांवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. मोहम्मद आमीरचं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे.


आशिया कपमध्येही स्पॉट फिक्सिंगची सावली


नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्येही स्पॉट फिक्सिंगची ऑफर करण्यात आली होती. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजाद यानं मला फिक्सिंगसाठी संपर्क करण्यात आला असल्याची तक्रार आयसीसीकडे केली होती. या प्रकरणाची आता चौकशी होत आहे.


या ५ कर्णधारांशीही संपर्क


एका वर्षामध्ये ५ आंतरराष्ट्रीय टीमच्या कर्णधारांशी स्पॉट फिक्सिंगसाठी संपर्क करण्यात आला होता, असं आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख ऍलेक्स मार्शल यांनी सांगितलं. यामध्ये पाकिस्तानी टीमचा कर्णधार सरफराज अहमद आणि झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रीम क्रिमर यांचा समावेश आहे. या दोघांनीही आम्हाला फिक्सिंगची ऑफर देण्यात आल्याचं मान्य केलं होतं. सरफराजनं श्रीलंका दौऱ्यादरम्यान याबद्दलची तक्रार केली होती.