`श्रीशांतची बॉडी पाहून आता हरभजन सिंगही घाबरेल`
मॅचफिक्सिंगच्या आरोपानंतर श्रीशांतने आपल्या आयुष्यातील सेकंड इनिंगला सुरुवात केली होती.
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटविश्वापासून दुरावलेला क्रिकेट एस. श्रीशांत सध्या प्रकाशझोतात आला आहे. मॅचफिक्सिंगच्या आरोपानंतर श्रीशांतने आपल्या आयुष्यातील सेकंड इनिंगला सुरुवात केली होती. कन्नड चित्रपटसृष्टीत नशीब आजमवण्याचा मार्ग निवडलेल्या श्रीशांतचा केम्पगोडा-2 या चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठी सध्या श्रीशांत जीममध्ये प्रचंड घाम गाळत आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. या फोटोंमधील श्रीशांतने कमावलेली शरीरयष्टी पाहून अनेकजण चकित झाले आहेत. मात्र, यावरून आता सोशल मीडियावर एका दुसऱ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
2008 साली आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या हरभजन सिंहने एका मॅचनंतर श्रीशांतच्या कानाखाली लगावली होती. त्यानंतर डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहणाऱ्या श्रीशांतचा फोटो आणि हे एकूण प्रकरण बरेच गाजले होते. हाच धागा पकडत आता सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झालेय. श्रीशांतची आत्ताची शरीरयष्टी पाहून हरभजनने त्याला श्रीमुखात लगावण्याआधी नक्कीच विचार केला असता, अशी मजेशीर मिम्स व्हायरल होताना दिसत आहेत.